ठाणे : पाण्याची लाईन दुरुस्त करताना बाजूलाच असलेली महानगरची भूमिगत गॅसची लाईन तुटल्याची घटना पाचपाखाडी, सर्व्हिस रोड परिसरात आज (ता.४) घडली आहे. ही लाईन फुटल्यामुळे या परिसराची जवळपास पाच हजार गॅस कनेक्शन धारकांचा गॅसचा पुरवठा बंद झाला आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. मात्र दुरुस्ती होईपर्यंत दोन ते तीन तासांचा कालावधी लागणार असल्याने एन सकाळी हा सर्व प्रकार घडला असल्याने नागरिकांची गरसोय झाली आहे. ठाण्यातील पाचपाखाडी येथील गुरुकुल सोसायटी जवळील सर्व्हिस रोड परिसरात सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला आहे. याच परिसरात असलेले पाण्याचे कनेक्शन वारंवार लिकेज असल्याने व रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना गॅसच्या लाईनला धक्का लागल्याने लाईन फुटली. लाईन फुटल्याने सर्व गॅस मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले होते. २० मिनिटे हा सर्व प्रकार सुरु होता. घटनेची माहिती समजताच आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सर्व परिस्थिती २० मिनिटात आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र गॅसची लाईन फुटल्यामुळे या परिसरातील ५ हजार गॅस कनेक्शन धारकांचा गॅस पुरवठा मात्र बंद झाला. गॅसचा पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.
