राज्यातील सुमारे 7 हजार तरुणांना मिळणार नौकानयन विषयाचे प्रशिक्षण; बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांची माहिती

0

राज्यातील नौकानयन क्षेत्रातील मनुष्यबळास योग्य प्रशिक्षण, कौशल्य वृद्धीसंदर्भात सहाय्य करण्यासाठी बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सागरी मंडळ (मेरिटाइम बोर्ड) आणि चेन्नईमधील भारतीय सागरी (मेरिटाइम) विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करण्यात आला. महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी आणि भारतीय सागरी विद्यापीठाच्या संचालक कमोडोअर राजीव बन्सल यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या करारामुळे राज्यातील इनलँड वेसल्सवर तैनात होणाऱ्या सुमारे 7 हजार तरुणांना नौकानयन विषयक कौशल्य व प्रशिक्षण मिळणार आहे. यावेळी परिवहन व बंदरे विकास विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मंडळाचे मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन संजय शर्मा आदी उपस्थित होते. राज्यातील नौकानयन क्षेत्राच्या वाढीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून देशातील पहिल्या सागरी विद्यापीठासोबत मंडळाने सामंजस्य करार केला आहे. सागरी विद्यापीठासोबत सामंजस्य करार करणारे महाराष्ट्र सागरी मंडळ ही पहिलीच संस्था आहे. या करारानुसार, राज्यातील नौकानयन क्षेत्रातील मनुष्यबळास योग्य असे तांत्रिक व इतर प्रशिक्षण देणे, त्यांच्यातील कौशल्य वाढविणे यासाठी भारतीय सागरी विद्यापीठ महाराष्ट्र सागरी मंडळाला सहकार्य करणार आहे. तसेच राज्याच्या किनारपट्टी भागातील सागरी उपक्रमांना चालना देण्यासाठी व सुविधा वाढविण्यासाठी आवश्यक असणारे संशोधन, अभ्यासक्रम व प्रशिक्षण यांचा आराखडा तयार करण्यासाठीही विद्यापीठ सहकार्य करणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:35 PM 01-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here