नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी (ता.४) पाचव्यांदा रेपो रेटमध्ये कपात केलेली आहे. चलनविषयक धोरण समितीच्या समीक्षा बैठकीत आरबीआयकडून रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी घटवून ५.१५ टक्के ऐवढा केला आहे. याचा फायदा बँकेतून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. यामुळे कर्जावरील हप्ताही काही प्रमाणात कमी होणार आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीडीपीचा वृद्धिदर पाच टक्क्यांवर आला आहे. हा दर सहा वर्षांतील निचांकी आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी वर्षभरात चारवेळा रेपो रेटमध्ये कपात केलेली आहे. १.१० इतका रेपो रेट चारवेळा कमी करण्यात आला आहे. रिव्हर्स रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी कमी करुन ४.९० टक्के करण्यात आला आहे. तर बँकेचा रेट ५.४० टक्के झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने २०१९-२० जीडीपीचा अंदाज ६.९ टक्क्यांवरून कमी करुन ६.१ टक्के केला आहे. तसेच २०२०-२१ मध्ये जीडीपीचा अंदाज ७.२ टक्के केला आहे. गृह कर्ज आणि वाहन कर्जावरील व्याजदर कमी झाल्यामुळे ग्राहकांना महिन्याला भरावा लागणारा EMI देखील कमी होण्यास मदत होणार आहे.
