आदित्य ठाकरेंना अभिजीत बिचुकले देणार आव्हान

0

मुंबई : वरळी विधानसभेसाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे महायुतीचे उमेदवार म्हणून उभे आहेत. आता त्यांच्या विरोधात बिग बॉस मराठी दुसऱ्या सीझनमधील चर्चित स्पर्धक अभिजीत बिचुकले आव्हान देणार आहेत. अभिजीत बिचुकले आज (४ ऑक्टोबर) वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बिचुकले अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत. आदित्य ठाकरे यांनी काल (३ ऑक्टोबर) शक्तिप्रदर्शन करत वरळीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ठाकरे कुटुंबीय आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे अ‍ॅड. सुरेश माने यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यात येणार आहे. तर आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. दरम्यान, अभिजीत बिचुकले साताऱ्यातूनही विधानसभा निवडणूक लढवणार आहे. भाजपचे उमेदवार शिवेंद्रराजे यांच्याविरोधात बिचुकले लढणार आहे. अभिजीत बिचुकले साताऱ्याचे आहेत. बिचुकले यांनी प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, ऐनवेळी ते माघार घेत असत. साताऱ्यात उदयनराजेंविरोधात त्यांनी अनेकदा खासदारकीही लढवली, मात्र दोन हजार मतेही मिळाली नाहीत. यंदा त्याने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्जही भरला होता. अभिजीत बिचुकलेंवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनच्या मध्यात अभिजीत बिचुकलेंना पोलिसांनी थेट सेटवरून अटक केली होती. चेक बाऊन्सप्रकरणी त्यांना अटक झाली होती. त्यानंतर खंडणीचाही गुन्हाही दाखल झाला. दीड महिन्यांनी जामीन मिळाल्यानंतर त्यांनी बिग बॉसच्या घरात पुन्हा एन्ट्री केली होती.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here