रत्नागिरी जिल्ह्यात ‘हायवे मृत्युंजय दूत’ उपक्रमाला प्रारंभ

0

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांमध्ये जखमी होणाऱ्याना तातडीने मदत मिळावी, यासाठी ‘हायवे मृत्युंजय दूत’ हा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यात दि. १ मार्च २०२१पासून सुरू झाला. महामार्गावरील कशेडी, चिपळूण आणि हातखंबा येथील पोलीस मदत केंद्रांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

राज्य महामार्ग पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा प्रारंभ आजपासून रायगड परिक्षेत्र पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. देशात महामार्गावरील रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख नागरिकांचा मृत्यू होतो. वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. हीच बाब ओळखून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील मॉल, पेट्रोलपंप, ढाबे, हॉटेल्समधील कर्मचारी, गावातील नागरिकांचा समावेश असेल. चार-पाचजणांचा समूह तयार करून त्यांना मृत्युंजय दूत या नावाने संबोधले जाईल. खासगी, शासकीय हॉस्पिटलचे अधिकारी तसेच सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांमार्फत या देवदूतांना जखमींवर प्रथमोपचार कसे करावे, त्यांना कसे हाताळावे, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. देवदूतांच्या प्रत्येक समूहाला स्ट्रेचर आणि प्राथमिक उपचाराचे साहित्यही देण्यात येणार आहे. महामार्गावरील हॉस्पिटलची नावे आणि त्यांचे संपर्क क्रमांकही देवदूतांकडे असतील. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका कोठे आहे, याची अद्ययावत माहितीही त्या देवदूतांकडे असेल. याशिवाय यादीतील हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेच्या चालकांचे क्रमांकही त्या समूहाकडे असतील. स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहिती देण्याची जबाबदारीही हे दूत पार पाडतील हायवे मृत्युंजय दूतांना महामार्ग सुरक्षा पथकाकडून ओळखपत्र देण्यात येणार आहे. चांगले काम करणाऱ्या देवदूतांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:59 AM 02-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here