मुंबई : शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता आणि घालमेल कायम ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिकिट वाटपामध्ये बाजी मारून सर्वांनाच धोबीपछाड दिला आहे. इतकेच काय राजीनामे खिशात घेऊन फिरणाऱ्या शिवेसेनेलाही वेळीच ‘थंड’ करून मुखंमत्र्यांनी बाजी मारली. फिफ्टी-फिफ्टीचा धोशा पिटणाऱ्या सेनेला सव्वाशेच्या खालीच गार करून मित्रपक्षांना आपल्या कोट्यातून जागा दिल्या. त्यामुळे तिकिटवाटपामध्ये मुख्यमंत्र्यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट आहे. भाजप सेनेकडून महायुतीची घोषणा करण्यात आली, पण जागांचा फॉर्म्युला शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहिला. तिकिटवाटप जाहीर झाल्यानंतर भाजपचा वरचष्मा दिसून आला. भाजपने चार यादीमध्ये तिकिटवाटप करताना १५० उमेदवारांची यादी जाहीर केली, तर मित्रपक्षांना १४ जाग सोडल्या. मुख्यमंत्र्यांना सातत्याने आव्हान दिलेल्या एकनाथ खडसेंचा पत्ता कापण्यात आला. त्यांना डावलून त्यांच्या कन्येला मुक्ताईनगरमधून उमेदवारी देण्यात आली. प्रथमच विधानसभेच्या रिंगणात उतरत असलेल्या चंद्रकात पाटील यांच्यासाठी पुण्यातील कोथरुडमधून मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करण्यात आला. गिरीष बापट यांची लोकसभेला वर्णी लागल्याने त्यांच्या जागेवर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना संधी देण्यात आली. वेळ संपत आली, तरी चंद्रशेखर बावनकुळे अजूनही आशेवर आहेत. विक्रमगडचे आमदार विष्णू सावरा यांची प्रकृती ठिक नसल्याने चिरंजीव हेमंत सावरांना संधी देण्यात आली. खडसे यांच्यासह मंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता यांनाही नारळ देण्यात आला. त्यामुळे भाजपकडून १८ विद्यमान आमदारांना डावलून एकतर आयारामांना किंवा डावलण्यात आलेल्या नातेवाईकांना तिकिट देण्यात आले.
