रत्नागिरी : नवरात्रौत्सवात परतीच्या पावसानेही पाठ फिरविली असताना आगामी दोन दिवस जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर गायब झालेल्या पाऊस येत्या ५ आणि ६ ऑक्टोबरला वादळी वाऱ्यासह बरसण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. यंदाच्या पाऊस हंगामात सुरवातीलाच रडरखडत आणि प्रतिक्षा करायला लावणाऱ्या मोसमी पावसाने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झोडपून काढले होते. सप्टेंबरअखेरपर्यंत पावसाचा मुक्काम वाढला होता. त्यामुळे सरासरीपेक्षा समारे बाराशे मि. मी. विक्रमी जादा मजल यावर्षी पावसाने मारली आहे. सात वर्षांपूर्वी २०१२ मध्ये पावसाने ४८४० मि.मी. पर्यंत सरासरी मजल गाठली होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यात पाऊस कमी झाला. आतापर्यंत जिल्ह्यात ४७९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत पावसाने ३४८७ मि.मी. सरासरीवर आटोपते घेतले होते. यावर्षी सात तालुक्यात पावसाने पाच हजारी मजल मारली आहे. अन्य दोन तालुक्यात पावसाने साडेतीन हजारपर्यंत पल्ला गाठला आहे. यामध्ये गुहागर आणि रत्नागिरी या दोन तालुक्याचा समावेश आहे.
