रत्नागिरी : पाऊस ओसरल्यानंतर जिल्ह्यात सुमारे ६०२ कि.मी. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र, रस्ते दुरूस्तीसाठी तयार करण्यात आलेल्या १६ लाख ८० हजारांच्या आराखड्याला आचारसंहितेचा फटका बसण्याची शक्यता आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही रस्ते दुरूस्ती आता उमेदवारांचीही डोकेदुखी ठरली आहे. जिल्ह्यात पावसाळ्यात अनेक अतंर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सर्वच तालुक्यात रस्ते खडेमय झाले असताना पाऊस गेल्यानंचर लगेचच या रस्त्यांची दुरूस्ती प्रस्तावित करण्यासाठी १६ लाख ८० हजाराचा आराखडा तयार करण्यात आला होता. यामध्ये ६०२कि.मी. रस्त्यांची दुरूस्ती प्रस्तावित करण्यात आली होती. तर या रस्त्यांच्या कायम दुरूस्तीसाठी तीन कोटीचा निधी प्रस्तावित केला होता. मात्र, विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने या रस्त्यांच्या कायम दुरूस्तीत अडसर निर्माण झाला असून केवळ १२५ कि.मी. रस्त्यांच्या दुरूस्ती प्रस्तावाला तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे उर्वरित रस्त्यांची दुरूस्ती निवडणुकीनंतर होणार आहे. आता रिंगणात असलेल्या उमेदवारांना या खड्डेमय रस्त्यांच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य हाच प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत.
