रत्नागिरी : यंदाच्या मत्स्य हंगामाला निसर्गाची अनुकूल साथ म्हणावी तशी मिळालेली नाही. गत आठवड्यात किनारपट्टी भागात झालेल्या वादळ सदृश परिस्थितीमुळे अनेक नौका बंदरात नांगरून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, वारा थांबताच गेल्या तीन चार दिवसांपासून पुन्हा खोल समुद्रात नौका मासेमारीसाठी जात असून अद्यापही मोठ्या प्रमाणात मासे मिळत नाहीत. मच्छीमारबांधव ‘बंपर’च्या प्रतीक्षेत आहेत. दि. १ ऑगस्टपासून यंदाच्या मत्स्य हंगामाला सुरुवात झाली. परंतु त्यावेळी समुद्र खवळलेला असल्याने अनेक नौका मालकांनी नारळी पौर्णिमेनंतरच मासेमारीला सुरुवात केली. यावेळी केवळ फिशींग जाळी असणाऱ्या नौकांनाच समुद्रात मासेमारीसाठी परवानगी देण्यात आली होती. या नौकांना सुरमई, पापलेट, संरंगा आणि कोळंबी सारखे किमती मासे मिळाले. नारळी पौर्णिमेनंतर दि. २ सप्टेंबरला गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. यादरम्यान समुद्र पुन्हा खवळला आणि मासेमारी ठप्प झाली. दि. १ सप्टेंबरपासून पर्ससीन नेट असणाऱ्या नौकांद्वारे मासेमारीला प्रारंभ झाला. या नौकांना बांगडा, गेदर आणि कोळंबी मोठ्या प्रमाणात मिळू लागली. मासेमारी हंगाम नित्यनेमाने सुरू झाला असे वाटत असतानाच सप्टेंबरच्या पंधरवड्यानंतर पुन्हा जोराने वारे वाहू लागले. त्यामुळे परजिल्ह्याबरोबरच परराज्यातील मासेमारी नौकाही रत्नागिरीतील अनेक बंदरात आश्रयाला आल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा मासेमारी बंद झाली होती. या काळात माशांचे दरही कडाडले होते. घटस्थापनेनंतर वाऱ्याचा जोर शमला. त्यानंतर पुन्हा खोल बंदरात मासेमारी सुरू झाली असून, नौकांना मासेही मिळत आहेत. मात्र, अद्यापही मोठ्या प्रमाणात मासे मिळालेले नाहीत. असे असले तरी मासेमारी हंगाम नित्यनेमाने सुरू झाल्यामुळे त्यावर आधारित असणाऱ्या इतर व्यावसायिकांचीही चलती सुरू झाली आहे. यामध्ये टेम्पो व्यावसायिक, आईस फॅक्टरी, जेटीवरील वर्कस यांनाही अच्छे दिन आले आहेत.
