चिपळूण : चिपळूण तालुका, शहर परिसरात रविवार, दि.६ रोजी सार्वजनिक स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या निर्देशानुसार या दिवशी स्वच्छता मोहिमेबरोबरच मतदार व मतदान जनजागृती कार्यक्रम होणार आहे. रविवार, दि. ६ रोजी गांधी सप्ताहानिमित्त संपूर्ण जिल्हाभरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गाव पातळीपासून शहर पातळीपर्यंत सार्वजनिक स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. शहरामध्ये चिपळूण नगर परिषदेच्या माध्यमातून विविध सामाजिक संस्था, प्रशासकीय यंत्रणा, नागरिक यांच्या सहकार्यान सकाळी ७ वाजल्यापासून संपूर्ण परिसरात स्वच्छता अभियान हाती घेतले जाणार आहे. यावेळी मतदार व मतदान विषयक जागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण जिल्हाभरात या दोन्ही उपक्रमांचे नियोजन जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या निर्देशानुसार केले जाणार आहे.
