रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोळे येथील गावठी दारूची निर्मिती करणाऱ्या हातभट्टी केंद्रावर शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत हजारो रूपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. मोरेश्वर अनंत पाटील असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिरजोळे येथे नदीलगत गावठी दारू निर्मिती सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांना लागली होती. मिळालेल्या माहितीनुसार हेड कॉन्स्टेबल जाधव, प्रविण बर्गे, राहुल घोरपडे, प्रविण खाम्बे यांनी मिरजोळेत अचानक धाड टाकली. यावेळी धरणाशेजारी त्यांना धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी नजिक जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी हातभट्टीद्वारे दारू निर्मिती सुरू असल्याचे दिसून आले. तसेच आजुबाजुला पाहणी केली असता दारूनिर्मितीचे रसायनदेखील आढळून आले. घटनास्थळी मिळालेला मुद्देमाल तत्काळ नष्ट करण्यात आला. तसेच या प्रकरणी मोरेश्वर अनंत पाटील याला ताब्यात घेण्यात आले आहे.
