मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे येत्या आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेणार आहेत. ईव्हीएमविरोधात मोर्चेबांधणीसाठी राज ठाकरे आणि ममता बॅनर्जींमध्ये बैठक होणार आहे. याच विषयावर चर्चा करण्यासाठी राज यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली होतील. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर जवळपास दीड महिन्यांनी राज ठाकरे ‘पॉलिटिकल पीच’वर उतरले होते. पुढच्या काळात होणाऱ्या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असं निवेदन त्यांनी स्वतः दिल्लीत जाऊन केंद्रीय निवडणूक आयुक्तांना दिलं होतं. तब्बल १४ वर्षांनी ते दिल्लीला गेले होते. या भेटीत त्यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीच्या दिशेनं मनसेनं टाकलेलं पहिलं पाऊल म्हणूनच त्यांच्या या भेटीकडे पाहिलं गेलं होतं. मात्र या घडामोडींनंतर, राज ठाकरे विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या विचारात असल्याचंही बोललं जात होतं. आता ईव्हीएमचा मुद्दा घेऊनच ते ममता बॅनर्जी यांना भेटायला जाणार असल्यानं हा संशय अधिक बळावला आहे. मोदी सरकारविरोधातील ममता बॅनर्जी यांचा राग आणि ईव्हीएमला त्यांचा असलेला विरोध हा सर्वज्ञातच आहे. त्यामुळे ही ‘राजनीती’ कुठल्या दिशेने जाते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
