ठाणे : संपूर्ण राज्यात महायुती झाल्याची ग्वाही मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी दिली असताना सिंधुदुर्गात युती नाही, असे स्पष्टीकरण भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिले आहे. सिंधुदुर्गात भाजपच्या अधिकृत तिकिटावर नितेश राणे उभे आहेत. येथे शिवसेनेने आपले अधिकृत उमेदवार म्हणून सतीश सावंत यांचे नाव जाहीर केल्यानंतर युतीत मिठाचा खडा पडला आहे. कुडाळमध्ये अपक्ष अर्ज दाखल केलेले राणेसमर्थक दत्ता सामंत आणि सावंतवाडीमध्ये अपक्ष लढणारे राजन तेली यांना भाजपाने आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला. सावंतवाडीत शिवसेनेचे उमेदवार पालकमंत्री दीपक केसरकर हे आहेत, तर कुडाळमध्ये विद्यमान आमदार वैभव नाईक हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. मात्र सेना-भाजपाचे एकास एक उमेदवार असल्याने आता राज्याचे लक्ष या जिल्ह्याकडे लागले आहे. कणकवलीत नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांना भाजपाने तिकीट देताच संतप्त शिवसेनेने सतीश सावंत यांना आपल्या एबी फॉर्मवर रिंगणात उतरवले आहे. एकेकाळचे राणेंचे कट्टर समर्थक असलेले सतीश सावंत यांनी कणकवली विधानसभा मतदार संघात अर्ज दाखल केल्याने भाजपवासी झालेले नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे विरुद्ध जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत हा सामना बिग फाईट सामना मानला जात आहे. सतीश सावंत यांना शिवसेनेने पाठिंबा दिला असून सर्वपक्षीय पाठिंब्यावर ते निवडणूक लढवणार आहेत. 2014 च्या निवडणुकीत नितेश राणे काँग्रेसच्या तिकिटावर 25 हजारांच्या मताधिक्यांनी विजयी झाले होते. मात्र, आता ते भाजपवासी झाले असून उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे 6 तास उरले असताना त्यांना भाजपने एबी फॉर्म दिल्याने ते भाजपचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेने आपला एबी फॉर्म देत सतीश सावंत यांना रिंगणात उतरवले आहे. सतीश सावंत यांनी 8 दिवसांपूर्वी राणेंच्या स्वाभिमान पक्षाला सोडचिट्ठी देऊन पक्ष सोडला होता. आता ते शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असल्याने महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांचा एबी फॉर्म असलेले दोन उमेदवार कणकवली या एकमेव मतदार संघात आमनेसामने ठाकणार आहेत. महाराष्ट्रातील ही सर्वांत बिग फाईट लढत मानली जात आहे.
