”फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार”

0

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या वेगवेगळया निर्णयांमुळेच 1 एप्रिलपासून वीज ग्राहकांना 2 टक्के स्वस्त दराने वीज मिळणार आहे. सत्ताधाऱ्यांनी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असा टोला माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पुढील पाच वर्षातील वीज उत्पादन व खरेदी संदर्भातील अहवाल वीज नियामक आयोगापुढे सादर करण्याची पध्दत सुरू झाली. त्यानुसार ऑक्टोबर 2019 मध्ये हा अहवाल आयोगासमोर सादर केला. या अहवालाला मार्च 2020 मध्ये आयोगाने मंजूरी दिली. या अहवालात 1 एप्रिल 2021 पासून वीजदर 2 टक्क्यांनी कमी करता येईल असे नमूद केले होते. ग्राहकांना स्वस्त वीज उपलब्ध व्हावी यासाठी फडणवीस सरकारच्या काळात अवलंबिलेल्या धोरणाचे हे फलित आहे. बावनकुळे म्हणाले की, फडणवीस सरकार सत्तेत असताना पाच वर्षाच्या कालावधीत ऊर्जा खात्याच्या धोरणात बदल करताना भारनियमन मुक्त महाराष्ट्र, पायाभूत सोयी-सुविधांचा विकास असे धोरण ठेवून निर्णय घेतले गेले. राजकीय हस्तक्षेप बाजूला ठेवत ज्या कंपनीचा वीज दर कमी आहे त्या कंपनीकडूनच वीज विकत घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयामुळे महावितरण, महा पारेषण या वीज कंपन्यांची कार्यक्षमता वाढली. परिणामी कंपन्यांचाही नफा होऊ लागला. भाजपा सरकारने दूरदृष्टी ठेवून आखलेल्या धोरणांमुळे जनतेला 1 एप्रिल पासून 2 टक्के स्वस्त दराने वीज उपलब्ध होणार आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असे श्री. बावनकुळे यांनी नमूद केले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:56 PM 05-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here