कणकवलीत राणे विरुद्ध शिवसेना

0

कणकवली : अखेर भाजपने माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना शुक्रवारी एबी फॉर्म दिल्यानंतर शिवसेनेने तत्काळ पावले उचलत स्वाभिमान पक्षातून राजीनामा दिलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांना एबी फॉर्म देत उमेदवारी दिली. गुरुवारी नितेश राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाच होता. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेचे नेते खा. विनायक राऊत यांच्या हस्ते सतीश सावंत यांना भगवी शाल पांघरून आणि हातात भगवा झेंडा देऊन शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. शिवसेनेने महाराष्ट्रात युती असतानाही कणकवली मतदारसंघात हे पाऊल उचलल्यामुळे कणकवलीत राणे विरुद्ध शिवसेना अशी लढत पुन्हा एकदा रंगणार आहे. राणे यांना भाजप प्रवेश देऊन नितेश राणे यांना उमेदवारी दिली तर आपण शिवसेनेकडून उमेदवार रिंगणात उतरवणार, असे शिवसेनेने यापूर्वीच जाहीर केले होते. युती झाली आणि नितेश राणे यांना भाजपमध्ये गुरुवारी कणकवलीत भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आ.प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला. शुक्रवारी नितेश राणे यांना भाजपाचे पक्षीय संघटनमंत्री सतीश धोंड यांनी भाजप कार्यालयात अधिकृत उमेदवारीचा ए व बी फॉर्म दिला. यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आ.प्रसाद लाड, प्रमोद जठार हे भाजपचे नेते उपस्थित होते. एबी फॉर्म स्वीकारल्यानंतर नितेश राणे यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत भाजपाचे आणि स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या हातात भाजपचे झेंडे होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राणे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची जाहीर सभाही झाली. या सभेत युती असतानाही शिवसेनेने अधिकृत उमेदवार दिल्यास महाराष्ट्रात युतीला त्याची अडचण होईल, असा इशारा दिला. त्याचवेळी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेने निमंत्रण दिले तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला आपण उपस्थित राहू अशी भुमिकाही स्पष्ट केली. मात्र, शिवसेनेने राणे यांच्या विरोधात उमेदवार देण्याच्या केलेल्या घोषणेप्रमाणे सतीश सावंत यांना एबी फॉर्म दिला. चार दिवसांपूर्वी सतीश सावंत यांनी स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेने तत्काळ पावले उचलत त्यांच्याशी चर्चा केली होती. मुंबईतही चर्चा झाली होती. त्याच दरम्यान भाजपचेही अनेक स्थानिक पदाधिकारी सतीश सावंत यांना भेटले होते. स्वाभिमान पक्षाचेही कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे सतीश सावंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली होती. त्याचवेळी त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा होती. शुक्रवारी सतीश सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सकाळी सुरू केल्यानंतर त्यांनाही शिवसेनेकडून अधिकृत ए व बी फॉर्म देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर व शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी सतीश सावंत यांच्याशी चर्चा केली आणि एबी फॉर्म दिला. शिवसेनेच्या नवरात्रोत्सवातील प्रतिष्ठापना केलेल्या दुर्गामातेला वंदन करून शिवसैनिक व सोबत असलेल्या भाजप व स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांसह  सतीश सावंत यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसैनिकांनीही नेहमीप्रमाणे जोरदार घोषणा देत शक्‍तिप्रदर्शन केले. राणे यांच्या विरोधात शिवसेनेने सतीश सावंत यांच्यारुपाने उमेदवार उभा केल्याने आता या मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here