नवी दिल्ली/मुंबई : लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेले काँग्रेसचे नेते नाना पटोले आता विधानसभा निवडणुकीतही आपले भवितव्य आजमावत आहेत. काँग्रेसने शुक्रवारी जाहीर केलेल्या पाचव्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे पक्षाने कुडाळमधील आपला उमेदवार अखेरच्या क्षणी बदलला. हेमंत कुडाळकर यांना येथून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांच्याऐवजी चेतन मोंडकर यांना पक्षाने रिंगणात उतरविले आहे. नाना पटोले यांनी नागपूरमधून लोकसभेची निवडणूक लढविली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आता ते विधानसभा निवडणूकही लढवित आहेत. भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघाची त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज जाहीर झालेल्या काँग्रेसच्या इतर उमेदवारांमध्ये मोहनराव हंबर्डे (नांदेड दक्षिण), भाऊसाहेब पाटील (मुखेड), योगेश शंकर (पालघर), संतोष शेट्टी (भिवंडी) यांचा समावेश आहे. काँग्रेसने 40 स्टार प्रचारक नियुक्त केले आहेत. त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियांका गांधी-वधेरा, डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी, ज्योतिरादित्य शिंदे, अभिनेत्री नगमा, रजनी पाटील, यशोमती ठाकूर, चारुलता टोकस, सुष्मिता देव यांचा समावेश आहे.
