राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सावंतवाडीत दोघा उमेदवारांना एबी फॉर्म

0

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून उमेदवारी अर्ज दाखल करणारे प्रेमानंद ऊर्फ बबन साळगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी पक्षाचा एबी फॉर्म सादर केला असला तरी तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा पक्ष निरीक्षक सौ. अर्चना घारे-परब यांनी पक्षाचा एबी फॉर्म दाखल केल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले दोन एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, शनिवारी अर्ज छाननी तारीख असून 7 ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. या तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्चना घारे-परब यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर त्यांनी सर्वप्रथम पक्षाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे त्यांचा अर्ज वैध ठरवून साळगावकर यांचा अर्ज अवैध ठरू शकतो, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिली. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उमेदवार म्हणून नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना राष्ट्रवादीकडून तिकीट जाहीर झालेले असतानाच राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून रातोरात यापूर्वी येथे इच्छुक असलेल्या पक्ष निरीक्षक अर्चना घारे परब यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे नेमका आघाडीचा उमेदवार कोण असे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.तर दुसरीकडे सौ.घारे यांनी आपले वेगळे शक्‍तिप्रदर्शन करीत आयोजित काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पक्षाच्या शुक्रवारी पार पडलेल्या सावंतवाडी येथील मातृछाया मंगल कार्यालयातील मेळाव्यात आपली उपस्थिती दाखवली. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आम्ही जनमानसापर्यंत राष्ट्रवादी पोहोचवली असा दावा केला. त्यामुळे नेमके या दोन एबी फॉर्ममध्ये काय दडले हे मात्र, कळू शकले नाही. याबाबत सौ.घारे यांना विचारले असता त्यांनी आपल्याला रात्री 3 वाजता पक्ष निरीक्षक विलास माने यांनी फॉर्म आणून दिला. त्यामुळे आपण आज उमेदवारी अर्ज भरला. आता पुढचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या मेळाव्यात बबन साळगांवकर यांच्या उपस्थितीबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने असा निर्णय का घेतला? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here