मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावरील मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडची उभारणी करण्यासाठी आरे कॉलनीमधील वृक्ष तोडीला विरोध करणाया सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळताच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) काल रात्री आरे कॉलनीत झाडे तोडण्यास सुरुवात केली. यामुळे संतप्त पर्यावरणवाद्यांनी आरे कॉलनीकडे धाव घेवून निषेध करण्याचा प्रयत्न केला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आरेतील वृक्षतोडीला विरोध केला आहे. आरेतील जैवविविधता संपविण्याचा घाट लज्जास्पद आणि घृणास्पद आहे. आरेतील झाडांची कत्तल करण्यापेक्षा संबंधित अधिकाऱ्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवून तेथील दहशतवादी तळ उद्वस्त करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवायला हवे, असा संताप आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. आणखी एका ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, पर्यावरणवादी आणि शिवसेनेच्या स्थानिक सदस्यांनी झाडे कापण्याचा विरोध केला. मुंबई मेट्रो ३ साठी ज्याप्रकारे जंगल नष्ट केले जात आहे ते पाहून भारताने संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत जे काही सांगितले ते सर्व दावे खोडून काढल्याचे दिसत आहे. पर्यावरणवाद्यांना चिरडून रात्रीच्यावेळी झाडांची कत्तल करणे कितपत योग्य आहे? असा सवाल पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. याआधीही आदित्य ठाकरे यांनी आरे विरोधात भूमिका घेतली होती. त्यांच्या सुरात सूर मिसळून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आरेमधील मेट्रो कारशेडला विरोध केला होता. जे नाणार प्रकल्पाचे झाले तेच आरेच्या मेट्रो कारशेडचेही होईल, असा गर्भित इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला होता.
