सिंधू, साईप्रणित उपांत्यपूर्व फेरीत

0

टोकियो : भारताची बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधू व बी. साईप्रणित यांनी आपापल्या सामन्यांमध्ये विजय मिळवत जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. पाचव्या मानांकित सिंधूने एक तास चाललेल्या सामन्यात बिनमानांकित जपानच्या आया ओहोरीला 11-21, 21-10, 21-13 असे पराभूत केले. सामन्यातील पहिला गेम सिंधूला 21-11 असा गमवावा लागला. मात्र, दुसर्‍या गेममध्ये सिंधूने 21-10 अशी बाजी मारत सामना बरोबरीत आणला. तिसर्‍या गेममध्ये सिंधूने आपला हाच फॉर्म कायम ठेवत गेम 21-13 असा आपल्या नावे करीत पुढच्या फेरीतील आपली जागा निश्‍चित केली. पुढच्या फेरीत सिंधूचा सामना  चौथ्या मानांकित जपानच्या अकाने यामागुचीशी होणार आहे. पुरुष एकेरीत भारताच्या बी. साई प्रणितने जपानच्या कांता सुनेयामाला 45 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-13, 21-16 असे सरळ गेममध्ये पराभूत केले. सामन्यात प्रणितने जोरदार खेळ करीत जपानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला कोणतीच संधी दिली नाही. पुढच्या फेरीत प्रणितची गाठ इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआर्तोशी होईल. अन्य पुरुष एकेरीच्या सामन्यात भारताच्या एच. एस. प्रणॉयला डेन्मार्कच्या रॅसमस गेमकेकडून  9-21, 15-21 असे पराभूत व्हावे लागले. पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रनकीरेड्डी व चिराग शेट्टी जोडीने तीन गेमपर्यंत चाललेल्या सामन्यात चीनच्या हुआंग काई जियांग व चेंग लियु जोडीला 15-21, 21-11, 21-19 असे नमविले. पहिला गेम गमाविल्यानंतर भारतीय जोडीने पुढच्या दोन्ही गेममध्ये चमक दाखवत विजय मिळवला. त्यांची गाठ आता ताकेशी कामुरा व केगो सोनोडा या दुसर्‍या मानांकित जोडीशी होणार आहे. मिश्र दुहेरीत सात्विक साईराज रनकीरेड्डी व अश्‍विनी पोनप्पा जोडीला थायलंडच्या जोडीकडून 21-16, 21-17 असे पराभूत व्हावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here