‘आरे’मध्ये जमावबंदी लागू; सुरक्षा वाढवली

0

जोगेश्वरी : एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच गोरेगाव मेट्रो कारशेड प्रकल्पातील झाडे कापल्यामुळे पर्यावरण प्रेमीनी संताप व्यक्त केला आहे. वृक्ष तोडीचा विरोध करण्यासाठी पोहोचलेल्या पर्यावरण प्रेमींना मेट्रो कारशेड प्रकल्पात जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला. त्यादरम्यान, पर्यावरण प्रेमी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी पर्यावरण प्रेमीना अडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी महापालिका, मेट्रो प्रशासन, पोलिसांचा निषेध केला. या पार्श्वभूमीवर आरेतील मरोळ आणि मुलुंडकडे जाणारा प्रमुख मार्ग बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी कलम १४४ अर्थात जमावबंदी लागू केली आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी अनेक मुख्य मार्गावर बॅरिकेट्स लावली आहेत. मेट्रो कारशेड जवळून जाणाऱ्या सर्व मार्गावर प्रवेश बंदी केली आहे. पोलिस पर्यावरण प्रेमी युवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. जोपर्यंत दोषीवर कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत मेट्रो कारशेडमधून बाहेर पडणार नसल्याचा निर्धार पर्यावरण प्रेमीनी केला आहे. जवळपास ५० ते ६० युवकांचे मेट्रो कारशेडमधील कापलेल्या झाडाजवळ आंदोलन सुरु आहे. गोरेगाव आरे मेट्रो कारशेड विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर मेट्रो कारशेडमधील वृक्ष तोड़ीला सुरुवात करण्यात आली. यामुळे पर्यावरण प्रेमीनी संताप व्यक्त करुन राज्य शासनासह पालिका प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला. शुक्रवारी रात्री उशिरा कारशेडच्या आत असलेली झाडे मेट्रो प्रशासनाकडून तोडण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच शेकडो पर्यावरण प्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. जवळपास तीनशे ते चारशे मुंबईकर पर्यावरण प्रेमींनी घटनास्थळी धाव घेत झाड कापण्याचे काम थांबवून मेट्रो प्रशासनाला जाब विचारला. मेट्रो प्रशासन चुकीच्या पद्धतीने झाड कापत असल्यामुळे पर्यावरण प्रेमींसह सामाजिक संस्था, विविध ग्रुप, स्थानिकांनी मोठी गर्दी केली. सध्या या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरु आहे. झाडे कापायला सुरुवात केल्यामुळे मेट्रो कारशेड येथे भांडूप, पवई, अंधेरी, गोरेगाव येथून शेकडो पर्यावरण प्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात झाडे चुकीच्या पद्धतीने तोडण्यात येत असल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी रोष व्यक्त केला आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here