नवी दिल्ली : नुकत्याच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा पैलवान रवी दहियाला शुक्रवारी लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम योजनेत (टॉप्स) सहभागी करण्यात आले. तर, खराब फॉर्मचा सामना करणार्या साक्षी मलिकला या योजनेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) याची घोषणा केली. रवीने कझाकिस्तानच्या नूर सुल्तानमध्ये झालेल्या पुरुषांच्या 57 किलो वजनीगटात कांस्यपदक मिळवले. त्याने कांस्यपदक मिळवत टोकियो स्पर्धेमध्ये भारताचा ऑलिम्पिक कोटा निश्चित केला. साक्षीने 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकांची कमाई केली होती. गेल्या काही काळापासून तिला खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. नूर सुल्तान येथे 62 किलो वजनी गटात ती सुरुवातीच्या फेरीतून बाहेर पडली. भारोत्तोलक रगाला वेकंट राहुल यालादेखील ‘टॉप्स’मधून बाहेर करण्यात आले आहे. ज्यामध्ये 50 हजार रुपये मासिक वित्तीय मदत केली जाते. समितीने महिला कुस्तीगीर पूजा ढांडाने एका महिन्यासाठी हिसारमध्ये रोमानियन प्रशिक्षक फानेल कॉर्प सोबत सराव करण्याची केलेली मागणी मान्य केली. समितीने भारोत्तोलक मीराबाई चानूला वित्तीय मदत करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. तिने फिजिओ शिवानी भारुकाला सोबत ठेवण्याची मागणी केली होती. समितीने नुकत्याच मुंबई येथे झालेल्या बैठकीत 70 लाख रुपयांच्या वित्तीय प्रस्तावांना मंजुरी दिली. तीन राष्ट्रीय महासंघांनी (नेमबाजी, टेबल टेनिस व भारोत्तोलन) यांनी 2020, 2024 व 2028 ऑलिम्पिकसाठी आपली योजना आखली.
