मान्सूनच्या हंगामात पाऊस आणि पुरामुळे देशभरात 1900 बळी

0

नवी दिल्ली : यंदाच्या मान्सूनच्या हंगामात पाऊस आणि पुरामुळे देशभरात 1900 लोकांचा बळी गेला, तर 46 लोक बेपत्ता झाले आहेत. त्याचप्रमाणे 22 राज्यांतील 25 लाख लोकांना फटका बसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून शुक्रवारी सांगण्यात आले. देशातील काही भागात मान्सून अद्यापही सक्रिय असली तरी 20 सप्टेंबर रोजी मान्सून अधिकृतपणे संपला आहे. यंदाच्या मोसमात चार महिन्यांत 1994 पासूनचा सर्वाधिक पाऊस झाला असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. देशभरात एकूण 1900 बळी गेले असून 738 जण जखमी झाले आहेत. सुमारे 20 हजार प्राणी बेपत्ता झाले आहेत. देशभरात 1.09 लाख घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत, 2.05 लाख घरे अंशत: तर 14.14 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. पाऊस आणि पुराचे महाराष्ट्रात सर्वाधिक 382 बळी गेले असून 369 जण जखमी झाले आहेत. राज्यभरात 22 जिल्ह्यांना पूर व पावसाचा फटका बसला असून, 7.19 लाख लोकांना 305 मदत छावण्यांमध्ये आसरा घ्यावा लागला आहे. महाराष्ट्रा खालोखाल पश्चिम बंगालमध्ये 22 जिह्यांना फटका बसला असून 227 बळी गेले आहेत. जखमींची संख्या 37 तर 44 जण बेपत्ता झाले आहेत. प. बंगालमध्ये 280 मदत छावण्यांमध्ये 43,433 लोकांनी आश्रय घेतला आहे. बिहारमध्येही यंदा गंभीर पूर परिस्थिती असून त्यात 162 बळी गेले आहेत. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशात 182, केरळमध्ये 181, गुजरातमध्ये 169, कर्नाटकात 106 आणि आसाममध्ये 97 जणांचे बळी गेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here