देवगड समुद्रात कर्नाटकची अनधिकृतपणे मच्छीमारी करणारी नौका जेरबंद

0

देवगड ः देवगड समुद्रात परप्रांतीय नौकांचा धुडगुस सुरू असून महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात प्रवेश करून अनधिकृतपणे मच्छीमारी करणार्‍या कर्नाटक मलपी येथील परप्रांतीय नौकेला मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेने पकडले. ही कारवाई शुक्रवारी सकाळी 8 वा.सुमारास देवगड समुद्रात 20 क्षेत्रात केली.  मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, मत्स्यव्यवसाय विभागाच्या शीतल या गस्तीनौकेने गुरूवारी रात्री समुद्रात गस्त घालून सकाळी देवगड बंदरात परतत असताना समुद्रात 20 वावामध्ये कर्नाटक मलपी येथील नौका अनधिकृतपणे मच्छिमारी करीत असल्याचे निदर्शनास आले. त्या नौकांवर कारवाई करण्यासाठी जात असताना सात ते आठ नौकांनी  जाळी तोडून पलायन केले. तर ‘भुवनेश्‍वरी 1’ या नौकेला पकडण्यात गस्ती नौकेला यश आले. ही कारवाई मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला, सागर सुरक्षारक्षक योगेश फाटक, हरेश्‍वर खवळे, तांडेल नारायण हरचकर यांनी केली. पकडण्यात आलेल्या मलपी येथील जयंती सुवर्णा यांच्या मालकीच्या ‘भुवनेश्‍वरी 1’ या नौकेला कारवाईसाठी देवगड बंदरात आणण्यात आले.या नौकेवर तांडेल यांच्यासह 8 कर्मचारी असून नौकेमध्ये म्हाकुळ, बांगडा अशी दीड टनाची मासळी असल्याची माहिती परवाना अधिकारी महाडवाला यांनी दिली. नौकेवरील मासळीच्या लिलावाची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here