चिपळूणमध्ये ९० माजी सैनिकांना घरपट्टी माफ

0

चिपळूण : चिपळूण नगरपालिका हद्दीतील ९० माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घरपट्टीमाफीसाठी अर्ज दाखल केले आहेत. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेचा फायदा त्यांना मिळणार असून त्यांची घरपट्टी माफ होणार आहे.

राज्यातील माजी सैनिक आणि सैनिक विधवांना मिळकत कर १०० टक्के माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार नगरपालिका अथवा ग्रामपंचायत क्षेत्रातील माजी सैनिक अथवा त्यांच्या कुटुंबीयांना घरपट्टी माफ केली जाणार आहे. मिळकत करमाफीसाठी बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी शहर तसेच ग्रामीण भागातील माजी सैनिकांना घरपट्टीत अंशतः सूट दिली जात होती. त्यासाठी दोन स्वतंत्र आदेश जारी करण्यात आले होते. ते रद्द करून आता ग्रामीण आणि शहरी भागासाठी एकच अध्यादेश काढण्यात आला आहे. त्यानुसार माजी सैनिक, त्यांच्या विधवा पत्नी यांना राज्य सरकारने घरपट्टी माफ केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी चिपळूणमधील ९० माजी सैनिक आणि सैनिक विधवांनी अर्ज सादर केले आहेत. त्यांना घरपट्टी माफ करण्यात येणार आहे. घरपट्टीमाफीचा लाभ मिळण्यासाठी इतर माजी सैनिक अथवा त्यांच्या कुटुंबीयांनी कागदपत्रे जमविण्यास सुरवात केली आहे. एप्रिल महिन्यात नवीन करआकारणी होते. त्यापूर्वीच करमाफीसाठी माजी सैनिक प्रयत्नशील आहेत. माजी सैनिकांना तहसीलदार कार्यालयातून आवश्यक असलेले अधिवास प्रमाणपत्र अथवा इतर दाखले वेळेत मिळण्यासाठी सुलभ प्रक्रिया राबविण्यास सुरवात केली आहे. आवश्यक असलेले दाखले त्वरित मिळण्यासाठी चिपळूणचे तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी तहसीलदार कार्यालयातील प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. माजी सैनिकांना दाखल्यासाठी वणवण करावी लागणार नाही, याची खबरदारी बाळगण्याच्या सूचनाही संबंधित कर्मचा-यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापुढे माजी सैनिकांना दाखले मिळणे सुलभ होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:14 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here