मुंबई : प्रो-कबड्डी लीगच्या सातव्या हंगामात यू मुम्बा संघाने सुरुवातीच्या हैदराबाद येथे पार पडलेल्या सत्रात एक विजय मिळवण्यासोबत पराभवाला देखील सामोरे जावे लागले. लीगचे पुढचे सत्र 27 जुलैपासून मुंबई येथे सुरू होणार असून, यामध्ये चांगल्या कामगिरीचा निर्धार यू मुम्बाने केला आहे. सत्रातील सर्व सामने वरळीच्या एनएससीआय डोम येथे पार पडतील. आम्हाला सर्व सामन्यांमध्ये चमक दाखवावी लागणार आहे. मग तो सामना पुण्याविरुद्ध असेल किंवा इतर कोणत्याही संघासोबत. प्रत्येक संघासाठी आमच्या योजना वेगळ्या आहेत. आम्ही आमच्या चुकांवर मेहनत घेऊ, असे संघाचे प्रशिक्षक संजीव कुमार बलियान म्हणाले. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत कर्णधार फझल अत्राचली व संदीप नरवाल यांची देखील उपस्थिती होती. गेला हंगामदेखील आमच्यासाठी कठीण होता व हा हंगामदेखील आव्हानात्मक आहे. कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी तुमच्यावर असते. एक चढाईपटू अयशस्वी झाला तर, सर्व संघाच्या अपेक्षा तुमच्याकडून असतात, असे फाझल म्हणाला. नवीन खेळाडू किंवा प्रशिक्षक यांच्यासोबत चर्चा करताना तुम्हाला अडथळा येतो का, यावर बोलताना फाझल म्हणाला की, मी सर्वाधिक काळ भारतीय प्रशिक्षकांसोबत घालवलेला आहे. सामन्यादरम्यान मी माझ्या खेळाडूंशी हिंदीमध्ये बोलतो. मी येथे बराच काळ घालवत असल्याने मला थोडीफार हिंदी येते.
