वाटद एमआयडीसीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

0

खंडाळा : रत्नागिरी तालुक्यातील वाटदसह सहा गावांमध्ये एमआयडीसी आणण्यासाठी राज्य सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी ९१७ हेक्टर जमिन अधिग्रहित करण्यासाठी ग्रामस्थांना नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. मात्र, या एमआयडीसीला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला असून आपला विरोध उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे त्यांनी पत्राद्वारे नोंदवला आहे . वाटद एमआयडीसी हद्दपार करण्यासाठी मुंबईस्थित ग्रामस्थ तसेच स्थानिक ग्रामस्थांनी भक्कम एकजूट केली आहे. त्यासाठी ‘चलो खंडाळा’ अशी हाक सर्वांना दिली आहे. वाटद, कोळीसरे, कळझोंडी, मिरवणे, वैद्य लावगण, गडनरळसह अन्य ग्रामपंचायतींनी एक मताने वाटद एमआयडीसी विरोधाचा ठराव संमत केला आहे. मुंबईतील ग्रामस्थांनी वाटद एमआयडीसी संघर्ष समिती स्थापन केली आहे. आता पुढील पायरी म्हणून सहा गावांमधील ग्रामस्थांनी भक्कम एकजुट करण्याचे ठरवले आहे. एमआयडीसी विरोधी लढ्याचे नियोजन करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांपासून उद्योग मंत्रमंत्र्यांपर्यंत आपला विरोध कसा पोहोचवता येईल, याची रणनीती ठरवण्यासाठी ६ ऑक्टोबर रोजी खंडाळा येथील सर्वसाक्षी सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. आमदार उदय सामंत यांनी वाटदएमआयडीसीला स्थगिती देण्याचे पत्र उद्योग मंत्र्यांना दिले होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीला स्थगित देण्याचे आश्वासनही दिले .मात्र प्रत्यक्षात एमआयडीसीकडून मिळालेल्या पत्रांमध्ये स्थगितीचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष आहे. कोणत्याही परिस्थितीत ही एमआयडिसी रद्द झालीच पाहिजे, अन्यथा निवडणूकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here