गुहागर : तालुक्यातील कोकण एलएनजी प्रकल्पामध्ये शुक्रवारी १०० वे गॅसवाह जहाज दाखल झाले आहे. बीडब्लु पॅरीस असे हा जहाजाचे नाव आहे. या जहाजातून पुढील तीन दिवसात सुमारे १ लाख ५० हजार क्युबिक मीटर गॅस एलएनजी प्रकल्पात उतरवून घेतला जाणार आहे. कोकण एलएनजी प्रकल्पात जानेवारी २०१३ मध्ये पहिले गॅसवाहू जहाज आले. परंतु अनेक तांत्रिक कारणांमुळे या जहाजातील गॅस उतरवून घेणे शक्य झाले नाही. त्यानंतर जेटीची दुरुस्ती करून ऑक्टोबर २०१४ मध्ये पुन्हा एकदा गॅसवाहु जहाज कंपनीत आले. त्यामधील गॅस काढून घेण्याचे काम सुमारे १० दिवस सुरू होते. त्यानंतर कोकण एलएनजी प्रकल्पात दर महिन्याला ३ ते ४ अशा प्रमाणात ऑक्टोबर ते एप्रिल या काळात २० ते २५ गॅसवाह जहाजे येऊ लागली. गुरुवारी (ता. ३ ऑक्टोबर) कोकण एलएनजी प्रकल्पात १०० वे गॅसवाह जहाज आले आहे. पुढील २८ ते ३२ तासांच्या कालावधीत २५० व्यक्तींच्या सहकार्याने हा गॅस उतरविण्यात येणार आहे. यापूर्वी २८ सप्टेंबरला असेच जहाज आले होते. तर १०१ वे जहाज १३ ऑक्टोबरच्या दरम्यान येणार आहे.
