नाणारच्या चर्चेऐवजी तालुकानिहाय औद्योगिक वसाहती विकसित करा : सुहास खंडागळे

0

रत्नागिरी : नाणार रिफायनरी या विषयावर चर्चा करण्यापेक्षा कोकणात रोजगारासाठी शासनाने तालुकानिहाय औद्योगिक वसाहती विकसित कराव्यात, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्प उपयुक्त असल्याचे वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा या विषयावरून चर्चा होऊ लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर श्री. खंडागळे यांनी गाव विकास समितीची भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोकणच्या तरुणांची ५ वर्षे नाणार प्रकल्पविरोधाच्या वातावरणात गेली. आता पुढील पाच वर्षे नाणार समर्थन आणि विरोधाच्या चर्चेत जातील. त्यात कोकणची एक तरुण पिढी आपला रोजगार गमावून बसलेली असेल. तेव्हा नाणार हा विषय कोकणातील तरुणांसाठी संपला आहे. आता तालुकानिहाय उद्योगधंदे आणि पर्यावरणपूरक व्यवसाय कोकणात आणण्याचे काम शासनाने करावे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, कोकणातील तरुणांनी प्रत्येक तालुक्यात असणाऱ्या एमआयडीसीमध्ये नवीन प्रकल्पांसाठी शासनावर दबावतंत्राचा वापर करायला हवा. हा दबाव इतका हवा की कोकणातील प्रत्येक तालुक्यात एमआयडीसीमध्ये त्या त्या भागाच्या दृष्टीने पूरक असणारे व्यवसाय, नवीन उद्योगधंदे, प्रोसेसिंग युनिट, आय टी कंपन्या सुरू होण्यासाठी शासनाला सकारात्मक पावले उचलणे भाग पडले पाहिजे. नाणार प्रकल्प रद्द करण्यात आला, तेव्हा गाव विकास समितीमार्फत आम्ही भूमिका मांडताना हा प्रकल्प अन्य ठिकाणी जेथे नागरिकांचा विरोध नसेल तेथे करण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तेव्हा आमच्यावर टीका आणि विरोध करणारे अनेक राजकीय पक्ष हळूहळू आपल्या भूमिका बदलत असून नाणारचे समर्थन करत आहेत. आमची भूमिका आजही कायम आहे. हा प्रकल्प नाणारला न करता कोकणात अन्य ठिकाणी सर्वेक्षण करून करावा, जेणेकरून प्रकल्पदेखील बाहेर जाणार नाही आणि नाणार येथे प्रकल्प रद्द झाल्याने स्थानिक भूमिपुत्र शेतकऱ्यांना न्यायसुद्धा मिळेल. ज्या कथित भूमाफियांनी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या आहेत, त्यांचा हेतू साध्य होणार नाही. पुन्हा नाणार येथेच प्रकल्प व्हावा, ही चर्चा केवळ जुन्या विषयाला हवा देऊन त्यावर चर्चा सुरू करणारी ठरेल. पुन्हा कोकणात संघर्षाचे वातावरण निर्माण होईल. तरुणांचे, नागरिकांचे लक्ष त्याच विषयाकडे वळेल आणि मूळ उद्देश, कोकणचे अन्य प्रश्न बाजूला राहतील. आता शासन, स्थानिक लोकप्रतिनिधींकडे कोकणाला पूरक रोजगार, व्यवसाय, तालुकानिहाय एमआयडीसीसाठी पाठपुरावा करायला हवा, असे आवाहन श्री. खंडागळे यांनी केले आहे. तालुक्याच्या ठिकाणी रोजगार हाच स्थलांतर आणि बेरोजगारीवरचा उपाय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:59 PM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here