दाभोळे येथे एसटीच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू

0

देवगड : देवगडकडे जाणाऱ्या पोयरे-खुडीपाट देवगड या एसटीची पादचारी वृध्द महिलेला धडक लागून झालेल्या अपघातात दाभोळे बौध्दवाडी येथील प्रभावती कृष्णा जाधव (७०) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात दाभोळेबौध्दवाडी स्टॉपनजीक शक्रवारी सकाळी ७ वा. च्या सुमारास झाला. अपघातानंतर चालकाने एस.टी. न थांबविता देवगडला नेल्याने संतप्त दाभोळे ग्रामस्थांनी रास्तारोको सुरु केले. दरम्यान अपघात होवून दोन तास उलटून गेले तरी पोलिस व एस.टी.चे अधिकारी घटनास्थळी न आल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. दाभोळे-बौध्दवाडी येथील प्रभावती जाधव या शुक्रवारी सकाळी ७ वा.सुमारास रसत्याने चालत जात होत्या. दरम्यान पोयरे-खुडीपाट देवगड एस्टी घेऊन चालक परेश एकनाथ घाडी (३२) हे देवगडकडे जात होते. या एसटीची धडक रस्त्याचा डाव्या बाजुने पायी चालत जाणाऱ्या प्रभावती जाधव यांना पाठीमागून बसली. यामुळे त्या रस्त्यावर पडल्या. याच वेळी त्यांच्या डाव्या पायावरून एस्टीचे चाक गेल्याने पायाचा चेंदामेंदा झाला. मात्र अपघातानंतर एसटीचालक न थांबता निघून गेला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. दाभोळे-बौध्दवाडी स्टॉप येथे सकाळी ७ वा. वर्दळ नव्हती. मात्र अपघात झाल्यानंतर एस.टी.चालकाने घटनास्थळी न थांबता तसेच पलायन केले. या अपघाताची माहिती झाल्याचे पोलिस पाटील सानिका कदम यांनी तात्काळ १०८ अॅम्ब्युलन्स व पोलिसांना कळविले. या नुसार १०८ अॅम्युब्युलन्स तत्काळ घटनास्थळी दाखल झाली मात्र पोलिस दोन तास उलटूनही घटनास्थळी दाखल झाले नाही. पोलिस स्टेशनला येवून तक्रार द्या असे ग्रामस्थांना पोलिसांकडून सांगण्यात आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले.जोपर्यंत पोलिस घटनास्थळी दाखल होत नाही तोपर्यंत हलणार नाही असा पवित्रा घेत ग्रामस्थांनी वाहतूकही रोखून धरली. यामुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here