मद्यधुंद अवस्थेत एसटी बस चालवणाऱ्या चालकाची हकालपट्टी

0

मुंबई : मद्यधुंद अवस्थेमध्ये एसटी बस चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या मुजोर चालकाची मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार एसटी प्रशासनाने तातडीने एसटीच्या सेवेतून हकालपट्टी केली आहे. यापुढे देखील अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यास आपल्या नोकरीला कायमचे मुकावे लागेल, अशा कडक नियमावली प्रशासनाने राबवावी, असे निर्देश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रशासनाला दिले आहेत. यामुळे भविष्यात मद्यपान करून गैरवर्तन करणाऱ्यांना  कायमचा आळा बसेल. काल दि. २५ जुलै रोजी पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकावर अमोल चोले या एसटी चालकाने मद्यपान करून बेकायदेशीररित्या एसटीच्या शिवशाही बसचा ताबा घेतला. तसेच बेदरकारपणे सदर बस चालवून अपघात घडवला. संबंधित बसच्या वाहकाच्या व प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. परंतु सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी संबंधित चालकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पुण्याच्या विभाग नियंत्रकांनी सदर चालकाला एसटीच्या सेवेतून बडतर्फ करण्यात येत असल्याची माहिती दिली. प्रवासी हे दैवत समजून त्यांना सेवा देणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवासामध्ये त्यांना सुरक्षित व सौजन्यशील सेवा देण्याचे व्रत अंगिकारले पाहिजे, जेणेकरून एसटीवरचा प्रवाश्यांच्या अढळ विश्वासाला कोठेही तडा जाणार नाही. उपरोक्त प्रसंगासारख्या गैर कृत्यामुळे एसटीची प्रतिमा मालिन होणार नाही याची काळजी एसटीच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन रावते यांनी या प्रसंगी केले. यावेळी बोलताना, एसटीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या मुजोर रिक्षा चालकावर कडक कारवाई करून ज्यापद्धतीने त्यांच्या बेकायदेशीर रिक्षा परिवहन विभागाने तोडून टाकुन, निर्भयपणे काम करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्याला धीर दिला. त्याचप्रमांणे या कारवाईतून,  बेशिस्त वर्तन करून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेजबाबदार एसटी कर्मचाऱ्यांना देखील एसटीच्या सेवेतून बडतर्फ करून प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याचे एसटीचे उद्दिष्ट असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.     मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकाला एसटीच्या सेवेतून बडतर्फ केल्याच्या रावते यांच्या आदेशाचे समाजाच्या विविध घटकातून स्वागत होत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here