सुरत : भारतीय क्रिकेट महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर १०० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी भारताची पहिली क्रिकेटपटू ठरली. हरमनप्रीतने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सहाव्या आणि अंतिम टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात हा पराक्रम केला. हा पराक्रम करताना तिने महेंद्रसिंग धोनी व रोहित शर्मा यांना मागे टाकले आहे. दोघांनी ९८ टी-२० क्रिकेट सामने खेळले आहेत. हरमनप्रीतच्या या कामगिरीची दखल बीसीसीआयने घेतली असून सुरतमधील सामन्यादरम्यान तिला एक विशेष कॅप प्रदान करण्यात आली. हरमनप्रीत कौरने जून 2009 मध्ये इंग्लंडविरुद्ध टॉन्टनमध्ये पदार्पण केले होते. या अष्टपैलू खेळाडूने टी-२० मध्ये आतापर्यंत २७ विकेट्स घेतल्या असून २८.६१ च्या सरासरीने २ हजार ३ धावा केल्या आहेत. जर आपण महिला क्रिकेटपटूंबद्दल बोललो तर हरमनप्रीतही १०० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील दहावी क्रिकेटपटू ठरली आहे. दरम्यान, शुक्रवारी सहाव्या व अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेने १०५ धावांनी दारुण पराभव केला. मात्र, भारताने ही मालिका ३-१ अशी जिकली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ली (८४) आणि सुन लुस (६२) या सलामीवीरांनी पहिल्या गडय़ासाठी १४४ धावांची भागीदारी रचून आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला. त्यामुळे आफ्रिकेने २० षटकांत ३ बाद १७५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मग भारताची सुरुवात निराशाजनक झाली. आफ्रिकेने १७.३ षटकांत भारतीय संघाला अवघ्या ७० धावांत गुंडाळून विजयाची नोंद केली. आफ्रिकेची सलामीवीर लिझेल ली सामनावीर, तर मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणारी दीप्ती शर्मा मालिकावीर पुरस्काराची मानकरी ठरली. उभय संघांतील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला ९ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
