अपघाती मरण पावलेल्या ग्रामसेविकेच्या वारसांना ५४ लाख ४४ हजारांची भरपाई देण्याचे आदेश

0

रत्नागिरी : अपघातात मरण पावलेल्या ग्रामसेविकेच्या वारसांना ५४ लाख ४४ हजारांची भरपाई देण्याचा आदेश खेड येथील न्यायालयाने दिला आहे. ही भरपाई वाहनचालक आणि वाहनमालकांनी संयुक्तरीत्या देण्याचे आदेशात म्हटले आहे. शिरवली (ता. खेड) येथील सौ. गीता भालचंद्र तांबे या महिला ग्रामसेवक २६ ऑक्टोबर २०१४ रोजी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावरून मॉर्निग वॉक करत असताना त्यांना मुंबईहून खेडकडे सुसाट वेगाने येणाऱ्या झायलो कारने धडक दिली होती. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी २ मार्च २०१५ रोजी खेड येथील न्यायालयात नुकसानभरपाईसाठी दावा दाखल करण्यात आला होता. सहा वर्षांनी हा दावा सुनावणीसाठी आला असता दावेदारांचे वकील अॅड. सुधीर बुटाला यांनी केलेला युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने अपघातग्रस्त झायलो कारचा चालक सैफ अली फकी (रा. मुंबके) आणि गाडीचा मालक अकबर उमर परकार (रा. कर्जी) या दोघांना दोषी धरून मयत तांबे यांच्या कायदेशीर वारस पती भालचंद्र हरिश्चंद्र तांबे आणि मुलगा मीत भालचंद्र तांबे या दोघांना ५४ लाख ४४ हजार ८२८ रुपयांची भरपाई द्यावी, असा आदेश केला. भरपाईच्या रकमेपैकी १४ लाख ४४ हजार ८२८ आणि त्यावरील व्याज मयत ग्रामसेविका तांबे यांचे पती भालचंद्र तांबे यांना तर ४० लाख रुपये मुलगा मीत तांबे याच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये तो सज्ञान होईपर्यंत गुंतविण्यात यावेत, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. गीता तांबे मृत्यूसमयी शासकीय सेवेत कार्यरत होत्या. त्यांना २५ हजार ७४६ रुपये पगार होता. यानुसार त्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख १४ हजार ७८४ रुपये होते. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्यानुसार मयत व्यक्तीच्या उत्पन्नात ५० टक्के भविष्यकालीन उत्पन्न म्हणून मिळवले जाते. या वाढीनुसार ४ लाख ७२ हजार १७६ रुपये वार्षिक उत्पन्न गृहीत धरण्यात आले होते. मात्र यापैकी, एकतृतीयांश रक्कम वैयक्तिक खर्च म्हणून वजा करण्याची तरतूद असल्याने गीता तांबे यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख १४ हजार ७८४ रुपये इतके ठरविण्यात आले होते. तांबे यांच्या उर्वरित नोकरीचा कालावधी लक्षात घेऊन ५३ लाख ५१ हजार ३२८ उत्पन्न निश्चित करण्यात आले. वैवाहिक हक्काच्या नुकसानीकरिता ४४ हजार रुपये आणि मयताच्या अंत्यसंस्कारासाठी केलेल्या खर्चासाठी १६५०० असे एकूण ५४ लाख ४४ हजर ८२८ रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:27 PM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here