मुंबई : आरे बचाव आंदोलनात अटक झालेल्या सर्व २९ जणांची जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रात्री उशिरा सुटका करण्यात आली. अटक झालेल्या २४ पुरुषांना ठाणा जेलमधून व ५ महिलांना भायखळा येथून सोडण्यात आले. मेट्रो कार शेडसाठी आरे कॉलनीतील तब्बल तीन हजार झाडांची कत्तल करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास २५०० झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या कत्तलीविरोधात सर्वांनीच आवाज उठवला आहे, मात्र कत्तल रोखण्यात अपयश आले आहे. या कत्तलीला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी थेट आत टाकून गुन्हे दाखल केले होते. त्यांना अटक करुन बोरीवली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आंदोलकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. काल त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. तर आज त्यांची सुटका करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाकडून आरे वृक्षतोड विरोधातील सर्व याचिका फेटाळण्यात आल्यानंतर मेट्रो प्रशासनाने इतकी तत्परता दाखवली की शुक्रवारी मध्यरात्रीपासून कत्तलीस प्रारंभ केला. एका रात्रीत ४०० झाडे उभ्याची आडवी करून टाकली. पर्यावरणी प्रेमींकडून कत्तल सुरू असतानाही बाहेरून लढा दिला, पण पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतले होते.
