रत्नागिरीतील प्रकाशनाच्या पुस्तकाला सिंधुदुर्ग जि. प. शाळेत मान्यता

0

रत्नागिरी : येथील सत्त्वश्री प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलेय आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने संपादित केलेल्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ पुस्तकाच्या खरेदीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना मान्यता देण्यात आली आहे. ‘सिंधुसाहित्यसरिता’ हे सिंधुदुर्गातील प्रतिभावान साहित्यिकांच्या साहित्यविषयक कार्याचा आढावा घेणारे पुस्तक नुकतेच सत्त्वश्री प्रकाशनामार्फत प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रतिभावंत साहित्यिकांची ओळख करून देण्यात आली आहे. त्यामध्ये सिंधुदुर्गातील जे साहित्यिक सुप्रसिद्ध असूनही जनसामान्यांपर्यंत पोहचू शकले नाहीत, अशा वीस निवडक साहित्यिकांना स्थान देण्यात आले आहे. आ. सो. शेवरे, वसंत आपटे, प्रतिभा आचरेकर, पा. ना. मिसाळ, ल. मो. बांदेकर, डॉ. विद्याधर करंदीकर, आ. द. राणे, जी. टी. गावकर, विद्याधर भागवत, विजय चिंदरकर, आ. ना. पेडणेकर, श्रीपाद काळे, बाळकृष्ण प्रभुदेसाई, वसंत सावंत, परशुराम देसाई, लुई फर्नांडिस, हरिहर आठलेकर, वसंतराव म्हापणकर, जनयुगकार खांडाळेकर, महामहोपाध्याय वा. वि. मिराशी या साहित्यिकांचा त्यात समावेश आहे. पुस्तकातील लेख सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी लिहिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचया शिक्षण समितीच्या बैठकीत या पुस्तकावर चर्चा करण्यात आली. या पुस्तकातून जिल्हा परिषदेच्या शाळातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून त्यांना साहित्याविषयी गोडी लागण्यास मदत होऊ शकते. तसेच खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख विद्यार्थांना होणार आहे. या दृष्टीने शिक्षण समितीने विशेष ठरावाद्वारे जिल्ह्यतील प्रत्येक शाळेने आपल्या शालेय वाचनालयासाठी समग्र शिक्षा अनुदान अथवा सादील अनुदानातून ऐच्छिक स्वरूपात हे पुस्तक खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. याबाबत शिक्षण सभापती सौ. सावी लोके, शिक्षण समिती सचिव तथा शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, तसेचे शिक्षण समितीच्या सर्व सदस्यांचे आभार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुस्तकाचे संपादक तथा कोमसापच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी मानले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:07 PM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here