एमपीएससीची तारीख आज जाहीर होणार, लांबलेली पूर्वपरीक्षा आठवडाभरात

0

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुढे ढकलण्यात आलेली १४ मार्चची पूर्वपरीक्षा आठवडाभरात होईल आणि शुक्रवारी तिची तारीख जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधताना सांगितले.

राज्यात कोराेनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने परीक्षा घेणे योग्य नाही, असे राज्याच्या पुनर्वसन विभागाने कळविल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च रोजी होणारी पूर्वपरीक्षा पुढे ढकलली. गेल्या वर्षभरापासून ही परीक्षा वारंवार रद्द होत असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्यभर निदर्शने केली. पुण्यात शेकडो विद्यार्थी नवी पेठेत ठिय्या देऊन बसल्याने या भागात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तो वेळीच अटोक्यात आणला. विद्यार्थ्यांच्या निदर्शनांची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी रात्री साडेआठ वाजता फेसबुकच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, ही परीक्षा गेल्या वर्षी दिवाळीपूर्वी होणार होती. मात्र ती त्यावेळी पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्याच वेळी आता पुन्हा परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही, असे मी स्पष्ट केले होते. त्यानुसार १४ मार्च ही तारीख जाहीर करण्यात आली होती. परंतु राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. ज्या शासकीय यंत्रणेमार्फत ही परीक्षा घेतली जाते ती यंत्रणा कोरोना नियंत्रण आणि लसीकरणात व्यस्त आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या भावनांशी मी सहमत आहे. मी आजच राज्याचे मुख्य सचिव तसेच एमपीएससीला सूचना दिलेल्या आहेत की परीक्षेच्या तारखांचा घोळ संपवा. उद्या परीक्षेची तारीख जाहीर करा. ही तारीख येत्या आठ दिवसातील असेल. कोणी भडकवते म्हणून भडकून जाऊ नका. महसूल व इतर विभागाचे कर्मचारी परीक्षेच्या कामात असतात. पेपर वाटणे, नंबर बघून देणे, पेपर गोळा करणे, सुपरव्हिजन यासाठी कर्मचारीवर्ग लागतो. या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली आहे का, ती निगेटिव्ह आहे का, हे बघावे लागेल. कोरोना लस घेतलेलेच कर्मचारी परीक्षेच्या कामात असावेत अशा माझ्या सूचना आहेत. म्हणजे विद्यार्थी दडपणाखाली राहणार नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. विद्यार्थ्यांच्या गैरसाेयीबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:13 AM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here