ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व 431 ग्रामपंचायती व समुद्र किनारी राबविलेल्या ‘प्लास्टिक पिक अप डे’ मोहिमेतून 11 टन 132 किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. यात सर्वाधिक सावंतवाडी तालुक्यात अडीच हजार टन प्लास्टिक गोळा करण्यात आलेे. सिंधुदुर्ग जिल्हा हा स्वच्छतेत नेहमीच अव्वल राहिला आहे. आशिया खंडातील सर्वप्रथम हागणदारी मुक्त जिल्हा म्हणून बाजी मारली, तर स्वच्छ जिल्हा स्पर्धेत पठारी भागात या जिल्ह्यात देशात प्रथम क्रमांक मिळविला होता. गतवर्षी केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ दर्पण’ स्पर्धेतही जिल्ह्याचे उल्लेखनीय काम होते. मात्र, या जिल्ह्यालाही प्लास्टिकची समस्या भेडसावत आहे. गेली तीन वर्षे जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील किनारे स्वच्छता मोहीम राबवित आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक उचलले जात होते. यावर्षी केंद्र शासनानेच हा उपक्रम हाती घेतल्याने जिल्ह्यात सर्व किनारे व जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायत क्षेत्रात ही मोहीम 2 ऑक्टोबर रोजी राबविण्यात आली. त्याला प्रशासना बरोबरच नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला या मोहिमेला जिल्हाभरातून उत्तम प्रतिसाद लाभला होता. जिल्हा परिषद प्रशासनाने उत्तम नियोजन करीत निरीक्षक नियुक्त केले होते. यात 10 हजार 818 मुले, 10 हजार 617 मुली, 14 हजार 1 महिला व 14 हजार 1 पुरुष सहभागी झाले होते. एकूण 46 हजार 62 अधिकारी-कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते.प्लास्टिक पिक अप डे मोहिमेत 11 टन 132 किलो 14 ग्रॅम प्लास्टिक मिळाले आहे. हे गोळा करतानाच त्याची विगतवारी करण्यात आली आहे. तसेच गोळा केलेल्या या प्लास्टिकची विल्हेवाट लावण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनाने गटविकास अधिकारी स्तरावर करण्यात आले आहे. प्रत्येक ग्राम पंचायतीने हे प्लास्टिक 27 ऑक्टोबरपर्यंत शासकीय अथवा खाजगी कचरा प्रकल्पाला देवून त्याची विल्हेवाट, लावण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार वेंगुर्ले नगर परिषद कचरा प्रकल्प, वागदे येथील खासगी प्रकल्प व दिलीप बिल्डकॉनचा कचरा प्रकल्पाला हे प्लास्टिक देण्याचे नियोजन आहे.
