खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची रायगडला बदली

0

रत्नागिरी : खेड पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून नेहमीच चर्चेत राहिलेल्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची रायगड जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी विधान परिषदेत आवाज उठवून त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची जोरदार मागणी केली होती.

दोन वर्षांपूर्वी सौ. पत्की खेडमध्ये दाखल झाल्या. काही दिवसांपूर्वी खेड येथील गोळीबार मैदानावर मनसेने आयोजित केलेल्या नगराध्यक्ष चषक क्रिकेट सामन्यांच्या बॅनरवर त्यांचा फोटो झळकला आणि त्यांच्या विरोधात वातावरण तापू लागले. शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे आमदार रामदास कदम यांनी याबाबत सभागृहात छायाचित्रांकित पुरावे सादर केले. सुवर्णा पत्की शासकीय अधिकारी असूनही त्या पक्षाच्या कार्यक्रमाला कशा उपस्थित राहू शकतात, असा प्रश्न उपस्थित केला. शिवाय करोनाचा संसर्ग वाढत असताना खेडमध्ये क्रिकेट सामन्यांना परवानगी कशी दिली गेली, हाही प्रश्न आहे. गोळीबार मैदानात क्रिकेटचे सामने रंगले होते. तेथे हजारो प्रेक्षक होते. कोणाच्याही तोंडाला मास्क नव्हता. सामाजिक अंतर पाळले नव्हते. या गर्दीत पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की प्रमुख पाहुण्या म्हणून व्यासपीठावर उपस्थित होत्या. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे, शाळा बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. लग्न समारंभालाही ५० पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही. असे असताना क्रिकेटच्या मैदानावर हजारो लोक जमले कसे, त्यांच्या तोंडाला मास्क नसताना पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असे प्रश्न उपस्थित करून रामदास कदम यांनी त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करून त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्की यांच्या बदलीचे आश्वासन दिले होते. गृहमंत्री देशमुख यांनी पत्की यांच्या बदलीचे संकेत दिल्यानंतर खेडमध्ये मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला विरोध केला होता. राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या नफिसा परकार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांचा निर्णय कसा चुकीचा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या महिला आघाडीनेही उपविभागीय पोलीस अधिकारी काशीद यांची भेट घेऊन सुवर्णा पत्की यांची बदली झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. मात्र पत्की यांच्या बदलीचे आदेश निघाले. त्यांची रायगड जिल्ह्यात बदली झाली आहे. त्यांच्या जागी रायगडचे बाळकृष्ण साहेबराव जाधव यांची नियुक्ती झाली आहे. कोकण परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संजय मोहिते यांनी तसे आदेश जारी केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:59 AM 12-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here