रत्नागिरी : पाली बाजारपेठेमध्ये मुंबई–गोवा महामार्गाचे चौपदरीकरणातील प्रस्तावित उड्डाणपूल उभारण्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्याच्या पुर्वतयारीमध्ये सध्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने भुसंपादनाच्या प्रक्रियेनुसार करुन दिलेली सध्याच्या वापरातील रस्त्याच्या दुतर्फा स्थिर आखणी ही नवीन प्रस्तावित उड्डाणपुलाच्या रस्त्यासाठी आतापर्यंत नेमलेल्या रस्त्याच्या प्रत्येक कंत्राटदाराच्या मापांनुसार उजवी किंवा डावी बाजुकडे कमी अधिक सरकत आहे. त्यामध्ये सुरु होणा-या उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाच्या अंतरांबाबत मात्र पाली बाजारपेठेमध्ये साशंकतेचे वातावरण सध्या पाहावयास मिळत आहे. पाली बाजारपेठेमध्ये महामार्ग चौपदरीकरणासाठी आवश्यक आखणीनुसार दुतर्फा ४५ मीटर रुंदीचे भुसंपादन झालेले असताना आता आखणीतील बदलानुसार संपादनाची मापे बदलत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पाली बाजारपेठेमध्ये चौपदरीकरणाची प्रक्रिया करीत असताना येथून जाणा-या मुंबई-गोवा व मि-या नागपूर या दोन राष्ट्रीय महामार्गांचा विचार करुन रस्ते विकास मंत्रालयाने येथे उड्डाणपुल मंजूर केला असून त्याची आखणी करुन त्याच्याकरीता सध्याच्या रस्त्याच्या वापरातील रस्त्याच्या दुतर्फां २२.५ मीटर असे एकूण ४५ मीटर एवढ्या रुंदीची आवश्यकता असल्याने त्यानुसार पुर्वीचे ३० मीटर भुसंपादन अगोदर फक्त नकाशावर झाल्याचे दाखवून केवळ उर्वरीत १५ मीटरचे आवश्यक ते भुसंपादन रितसर राजपत्रामध्ये ३ एची प्रक्रिया करुन केलेले आहे. त्यानुसार सध्याच्या वापरातील रस्त्याच्या मधील सफेद पट्टयाएैवजी रस्त्याच्या आखणीनुसार संपादन झालेल्या ४५ मीटरचा मध्यबिंदू काढून त्याठिकाणी रस्त्यावर खिळा मारुन सफेद मध्याचा गोल रंगाने दर्शविलेला होता तो योग्य नियमात होता. त्यावेळी रस्त्याच्या या विभागासाठी एमईपी ही कंपनी कंत्राटदार होती त्यांनी थोडे रुंदीकरणाचे काम दोन वर्षापूर्वी केले होते. त्यानंतर पाली बाजारपेठेमध्ये चौपदरीकरणातील रस्ते व उड्डाणपूलाचे काम करणा-या नवीन हान्स या कंत्राटदार कंपनीने सध्या येथे सपाटीकरण व भरावाची सेवा रस्त्यांसाठी मातीवर खडी पसरवुन तसेच उड्डाणपूलाच्या कामासाठी मशिनरी आणून जुन्या रस्त्याच्या कामांकरीता बॅंरिकेटींगही केले असून कामाचाी तयारी केली आहे. मात्र या चौपदरीकरणासाठी आवश्यक ४५ मीटर रुंदीचे भुसंपादन राष्ट्रीय महामार्ग विभागाने केले असून त्यामध्ये पहिल्या कंत्राटदाराने मध्यबिंदूपासून २२.५ मीटर दुतर्फां रुंदीच्या मापांचे मारलेल्या खिळ्यांऐवजी आता मात्र आखणीतील मापांनुसार या खिळ्यांपासून उत्तर व दक्षिण बाजूला २२.१,२२.२ ते २२.८, २२.९ अशी नवीन वाढीव भुसंपादनाची मापे दाखविण्यात येत आहेत. त्यामुळे पाली बाजारपेठेतील या नकाशावरील आखण्यांमुळे काही बाधकामांना पुन्हा नव्याने बाधित होण्याचा धोका संभवत आहे. त्यामुळे येथील प्रत्येक येणा-या नवीन कंत्राटदाराच्या आखणीनुसार मापांमध्ये होणारे भुसंपादनातील बदलांची सध्या स्थानिकांमध्ये चर्चा आहे. अन्यथा पहिल्या ३० मीटर नकाशावरील भुसंपादनाप्रमाणे हे वाढीव अंतराच्या मापांचेही कागदाऐवजी आखणीनुसारचे भुसंपादन होणार तर नाही याची भिती स्थानिकांमध्ये दिसून येते आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने भुसंपादनातील महसूल, भुमिअभिलेख विभागाला एकत्रित घेऊन भुसंपादनाच्या संयुक्त मोजणीच्या प्रमाणित नकाशानुसार मोजणी करुन व कंत्राटदाराकडील आखणीच्या मापांची वस्तुस्थिती दाखवून स्थानिकांच्या मनातील अंतराच्या बदलाच्या घोळाची स्पष्टता दाखविण्याची मागणी होत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:16 PM 12-Mar-21
