पनवेल : तळोजा नावडे फाटा येथील आदित्य बिर्ला कंपनीजवळ मुख्य रस्त्यावरील, बांधकाम सुरू असलेल्या कमानीचा काही भाग कोसळला. या कमानीवर दोन कामगार काम करत होते. या घटनेत कामगार राजेश शर्मा (वय २६ ) याचा उपचारानंतर मृत्यू झाला. तर दुसऱ्या जखमी कामगारांवर उपचार सुरु आहे. या घटनेमुळे काही काळासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. नावडे फाटा येथून तळोजा एमआयडीसीत प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेल्या चार-पाच महिन्यांपासून कमानीचे बांधकाम सुरू आहे. तळोजा एमआयडीसीचे प्रवेशद्वार म्हणून बांधण्यात येणाऱ्या या कमानीचा काही भाग कोसळून पडला. मुख्य रस्त्यावर हे काम सुरू असून याठिकाणी गाड्यांची मोठी ये-जा सुरू असते. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम सुद्धा झाले होते. गेल्या चार- पाच महिन्यांपासून त्या ठिकाणी कमानीचे बांधकाम सुरू असून आज कमानीच्या स्लॅब भरायचे काम सुरू होते. या दरम्यान एमआयडीसीकडून आदित्य इंटरप्रायजेस या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले होते. या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे नागरिकात कुजबूज चालू असून तळोजा पोलिसांनी यावर कारवाई करावी, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.
