रत्नागिरी : मागील काही काळात दरवाढीमुळे विस्कळीत झालेल्या सराफी बाजाराला सण, उत्सवांमुळे मागणीची झळाळी येऊ लागली आहे. दसर्यानिमित्त सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ सुरू झाली असून, प्रत्यक्ष विजया दशमी आणि दिवाळीपर्यंत त्यात आणखी वाढ होईल, असे येथील सराफ व्यावसायिकांनी सांगितले. सोन्याचा प्रतितोळा भाव 39 हजार रुपये असून, चांदीचा प्रतिकिलो दर 47 हजार रुपये आहे. गेला काही काळ सराफी बाजारात असलेली मरगळ निघून गेली आहे. मंगळसूत्र, टेम्पल ज्वेलरी, सोनसाखळी खरेदीकडे नागरिकांचा कल आहे. मंगळसुत्रातील पेंडंट हिर्याचे बनविण्याकडे देखील कल वाढत आहे. चांदीची देवाची मूर्ती, निरंजन, लक्ष्मीची प्रतिमा यांना चांगली मागणी आहे. उत्सवकाळात भेट देण्यासाठी देखील या वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. सणासुदीमुळे वाढलेली मागणी आणि भावात झालेली घट यामुळे बाजारात चांगले वातावरण आहे. नवरात्रीच्या आणि पुढे दसरा-दिवाळीमध्ये बाजारात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. दसरा आणि दिवाळीच्या मुहुर्तावर सोने खरेदी करण्याचा ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे आतापासूनच मागणी नोंदविली जाऊ लागली आहे. पारंपरिक दागिन्यांबरोबरच नव्या डिझाईनलाही मागणी वाढत आहे. त्यामुळे सराफांच्या दुकानात मोठी गर्दी होऊ लागली आहे. दिवाळीनंतर येणार्या लग्नसराईपर्यंत तेजी टिकून राहील, असा व्यावसायिकांचा अंदाज आहे. देवीची मूर्ती, चांदीचे साहित्य अशा साहित्यांना या काळात विशेष मागणी असते. दसर्याला सोन्याच्या मागणीत अधिक वाढ होते. दागिने, आपट्याची सोन्याची पाने या दिवशी खरेदी केली जातात. लग्नसराईसाठी दागिने खरेदी करण्यासाठी देखील या दिवसाची निवड केली जाते. त्यानंतर पुन्हा दिवाळीची खरेदी सुरू होते. वस्तू आणि सेवा कराची नागरिकांना सवय होत आहे. अंमलबजावणीच्या अडचणीचे पहिले काही दिवस गेले असल्याने, त्याचा खरेदीवर काही प्रतिकूल परिणाम होताना दिसत नाही. सोन्यावर जीएसटी आहे. मात्र, जीएसटीबाबत झालेल्या जागृतीमुळे याबाबत ग्राहकांची तक्रार नाही. उलट आता पारदर्शक व्यवहार होऊ शकतो, असे ग्राहक म्हणत असल्याचे सराफ व्यावसायिक सांगत आहेत.
