सिंधुदुर्ग : सोमवार, 7 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने कोण-कोण रिंगणातून माघार घेणार, याची चर्चा सुरू असली, तरी माघार घेण्याच्या कुणीही मन:स्थितीत नाहीत. महाराष्ट्रात युती झाली असली, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र शिवसेना आणि भाजप अशीच लढाई होणार असल्याची चिन्हे आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघ युतीकडून भाजपला गेला, असला तरी शिवसेनेने सतीश सावंत यांना भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या विरोधात अधिकृत उमेदवारी दिली आहे. सतीश सावंत यांच्या प्रचारासाठी शिवसेनेची संपूर्ण यंत्रणा अर्ज दाखल केल्यापासून उतरली आहे. रविवारी देवगडात सतीश सावंत यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे उतरले होते. त्यामुळे कणकवलीत भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत निश्चित मानली जात आहे. या मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले संदेश पारकर हे उमेदवारी मागे घेणार की रिंगणातच राहणार, याची उत्सुकता आहे. संदेश पारकर यांनी यापूर्वी राणे यांच्या विरोधात एकास एक लढत देण्याची रणनीती जाहीर केली होती. संदेश पारकर यांच्या संपर्कात शिवसेनेचे नेते असून ते पारकर यांच्याशी त्यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी चर्चा करणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. पारकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, तर नितेश राणेंविरुद्ध सतीश सावंत अशी रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. याच मतदारसंघात काँग्रेसचे सुशील राणे, मनसेचे राजन दाभोलकर, वंचित आघाडीच्या मनाली संदीप वंजारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बसपाचे विजय साळकर हेही या मतदारसंघात रिंगणात आहेत. उर्वरीत काही उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून एकूण 10 उमेदवारांचे अर्ज दाखल होते त्यापैकी दत्ता सामंत यांचा अर्ज अवैध ठरला आहे. शिवसेनेचे उमेदवार आ.वैभव नाईक यांच्या विरोधात भाजपाच्या पाठिंब्यावर अतुल काळसेकर किंवा रणजीत देसाई यापैकी एकाला उमेदवारी मिळणार आहे. मात्र, रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत याचा निर्णय जाहीर झाला नव्हता. या मतदारसंघातही वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धीरज परब आणि काँग्रेसचे चेतन मोंडकर तसेच बहुजन समाज पार्टीचे रवींद्र कसालकर या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. देसाई आणि काळसेकर यांच्यापैकी नेमका कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार हे ठरल्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, या मतदारसंघात शिवसेना विरूध्द भाजप आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा असलेला उमेदवार अशी लढत पहायला मिळणार आहे.
