नाम साधर्म्याचे उमेदवार…अन् राजकीय गणिते!

0

खेड : दापोली विधानसभा मतदारसंघात संजय कदम व योगेश कदम नावाचे अनेक उमेदवार रिंगणात असल्याने राष्ट्रवादीचे संजय कदम तसेच शिवसेनेचे योगेश कदम यांच्या समर्थकांना उमेदवाराच्या चेहर्‍यापेक्षा चिन्हाचा प्रचार अधिक करावा लागणार आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीत आघाडी व युतीचे अस्तिव हरवलेलं दिसत आहे. अपक्ष उमेदवारांचा भरणा या मतदारसंघात बघायला मिळत आहे. आतापर्यंत एकूण 16 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, खरी लढत या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच पहायला मिळणार आहे. या विधानसभा मतदार संघात दोन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांत आपली ताकत गेल्या पाच वर्षात टिकवण्या व वाढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असले तरी विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना मतांची मोट बांधताना दिवसरात्र एक करावी लागणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात शिवसेना व राष्ट्रवादीसाठी दापोली विधानसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा मानला जात आहे. सर्वाधिक चुरशीचा सामना या मतदारसंघात रंगणार असल्याचे दोन्ही पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनवरून स्पष्ट झाले आहे. शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री रामदास कदम, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय भोसले याच मतदारसंघातील रहिवासी आहेत. रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत तर पाच वर्षांपूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेले व आमदार झालेले संजय कदम राष्ट्रवादी चे अधिकृत उमेदवार आहेत. आगामी निवडणूक योगेश कदम व संजय कदम यांच्यामध्येच थेट दिसत असली तरी ती तुल्यबळ आहे. भाजपाचे केदार साठे यांनी युतीचा धर्म न पाळता उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुती या मतदारसंघात संपुष्टात आली आहे तर काँग्रेसचे तिन्ही तालुकाध्यक्ष  आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना गैरहजर राहून नाराजी व्यक्त करत  मुश्ताक युनुस मिरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात राजकीय ओढाताण गेल्या दहा वर्षात येथील जनतेने पहिली आहे. त्यातूनच दोन्ही पक्ष बळकट होताना दिसत असून तुलनेने काँग्रेस, भाजपा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने या मतदारसंघात कमकुवत होत आहे. गेल्या दहा वर्षांत झालेल्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद-पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत निवडणुका पाहता शिवसेना व राष्ट्रवादी या दोनच पक्षाभोवती या मतदारसंघात राजकीय समीकरण फिरताना दिसत आहेत. या मतदारसंघातील खेड, दापोली व मंडणगड तालुक्यात पाच वर्षांपूर्वी शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व होते. मात्र, शिवसेनेचे संजय कदम राष्ट्रवादीमध्ये गेले आणि शिवसेनेचे आमदार सूर्यकांत दळवी यांचा पराभव झाल्यानंतर हा सेनेचा बालेकिल्ला ढासळला. शिवसेनेचे पराभूत उमेदवार दळवी हा सेनेचा गड राखण्यासाठी कमकुवत ठरल्याने सेना नेतृत्वाने या मतदारसंघाची जबाबदारी तरुण योगेश कदम यांच्याकडे दिली. राष्ट्रवादीतून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर संजय कदम यांनी तिन्ही तालुक्यातील राष्ट्रवादी व सेनेतील त्यांच्या समर्थकांना सोबत घेऊन स्वतःचे वर्चस्व या मतदारसंघात अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केला. गेल्या पाच वषार्ंत एकाबाजूला मतदारसंघाचा विकास करण्याची जबाबदारी पेलतानाच त्यांना सेनेचे नवे तरुण नेतृत्व योगेश कदम व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या सेना नेते रामदास कदम, पालकमंत्री रवींद्र वायकर, तत्कालीन केंद्रीय मंत्री खासदार अनंत गीते यांच्याशी सतत सामना करावा लागला. गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघात झालेल्या सर्वच निवडणुका संजय कदम विरुद्ध योगेश कदम अशाच लढल्या गेल्या. सध्या खेड तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेलं यश, मंडणगड येथे नगर पंचायत निवडणुकीत मिळालेले यश ते अगदी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सुनील तटकरे यांच्या विजयापर्यंतचे यश हे संजय कदम यांचा आत्मविश्वास वाढवणारे ठरले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here