कोकेन प्रकरणाचा मास्टर माईड निघाला हवाई दलाचा कर्मचारी

0

रत्नागिरी एमआयडीसी मध्ये सापडलेल्या ५० लाखाच्या कोकेनचे हवाई दलासोबत कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. कोकेन प्रकरणाचा मास्टर माईड भारतीय हवाई दलाचा पंजाब येथील कर्मचारी मुकेश शेरॉन (रा. पंजाब) याच्यासह दिनेश सिंगला कोकेन देणारा अंकित सनबिर सिंग (वय २३ रा. राजस्थान) या दोघांच्या मुसक्या ग्रामीण पोलिसांनी आवळल्या आहेत. ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे.

२० जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास रत्नागिरी एमआयडीसी येथील एका पडक्या इमारतीत कोकेनचे डील होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर ग्रामीण पोलीसांच्या मदतीने पोलिसांनी छापा टाकून सुमारे ५० लाख किंमतीचे ९३६ ग्रॅम कोकेन जप्त केले होते. कोकेन प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके राजस्थान, पंजाब येथे पाठवण्यात आली होती. कोकेनचा मास्टर मार्इंड मुकेश शेरॉन हा पंजाब येथे भारतीय हवाई दलात सेवेत आहे. त्याने राजस्थान येथील अंकित सिंग याच्यामार्फत दिनेशकडे कोकेन दिले होते. तर रामचंद्र व मुकेश यांचे फोनवर वारंवार बोलणे होत होते. त्यामुळे पोलीसांनी मुकेश शेरॉन याला पंजाब येथून तर अंकित सिंग याला राजस्थान येथून ताब्यात घेतले आहे.

हवाई दलात सेवेत असलेल्या मुकेश याच्या अटकेची परवानगी स्थानिक न्यायालयाकडून देण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करून तेथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या परवानगीनंतर मुकेशला रत्नागिरीत आणण्यात येणार आहे. तर अंकित सिंग याला घेऊन पोलीस पथक रत्नागिरीत दाखल झाले आहे. शुक्रवारी खेड येथील न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. या दोघांच्या अटकेने पोलिसांना आता रत्नागिरीतील कोकेनचा खरेदीदार कोण आहे याचा सुगावा लागणे शक्य होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here