कुडाळ : खा.नारायण राणे यांच्याबरोबरचे त्यांचे अनेक कार्यकर्तेही नेहमी खोटे बोलतात, खोटी आश्वासने देतात. दत्ता सामंत यांनी शासकीय ठेकेदार असूनही त्यांनी ठेकेदार नसल्याबाबतची खोटी माहिती दिली हे जनतेला कळावे म्हणूनच आम्ही आक्षेप घेतला होता, अशी माहिती शिवसेना-भाजपा-रिपाई-रासप महायुतीचे उमेदवार वैभव नाईक यांनी दिली. आपला मोठ्या मताधिक्याने विजय होणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांचे खंदे समर्थक आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांनी शनिवारी अवैध ठरविला. त्यानंतर वैभव नाईक यांनी कुडाळ शिवसेना शाखेत पत्रकारांशी संवाद साधला. तालुकाप्रमुख राजन नाईक, जि.प.गटनेते नागेंद्र परब, जि.प.सदस्य अमरसेन सावंत, माजी पं.स.सदस्य अतुल बंगे, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, तालुका प्रमुख राजू जांभेकर, नेरूर सरपंच शेखर गावडे, राजू गवंडे, संदीप म्हाडेश्वर, कृष्णा तेली आदींसह शिवसेना-युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आ.नाईक म्हणाले, नारायण राणेंबरोबरचे हे कार्यकर्ते नेहमी खोटे बोलतात, खोटी आश्वासने देतात. ते लोकांकडे खोटे बोलतात, देवासमोर खोटे बोलतात आणि शासकीय कागदावरही खोटे बोलतात. हे आपणांस दाखवून द्यायचे होते म्हणूनच आपण आक्षेप घेतला. शपथपत्र खोटे करून माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्याने दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे. उर्वरित उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी मी लढत देणार आहे. कोणताही शासकीय ठेकेदार कोणतीही निवडणूक लढवू शकत नाही असा नियम आहे. दत्ता सामंत ठेकेदार असूनही त्यांनी ठेकेदार नसल्याची खोटी माहिती दिली त्यामुळे त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर यावा म्हणून आक्षेप घेतला. तो निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मान्य केला. आपण त्यांच्यावर कोणताही दबाव आणलेला नाही किंवा पालकमंत्री अथवा खासदारांनाही फोन केलेला नाही. नियमाप्रमाणे सामंत यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. शिवसेने बोलावले तर मी त्यांच्या प्रचाराला जाणार, असे वक्त्यव्य खा.नारायण राणे यांनी कणकवलीत केले होते. याबाबत त्यांना विचारले असता, आ. नाईक म्हणाले, आमच्या प्रचारासाठी नारायण राणेंची गरज नाही. आपण त्यांना प्रचारासाठी बोलविणारही नाही आणि त्यांच्याही प्रचाराला जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले.
