गुहागरात १११ किलो प्लास्टिक जप्त

0

शृंगारतळी : गुहागर नगर पंचायतीने ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत ११ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधित राबवलेल्या विविध कार्यक्रमातन प्लास्टिक बंदी प्रभावीपणे राबवली. यावेळी शहरातील बाजारपेठ व आठवडा बाजारात धडक कारवाई करीत तब्बल १११ किलो प्लास्टिक जप्त केले आहे. गुहागर नगरपंचायतच्या मुख्याधिकारी कविता बोरकर यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. नगरपंचायतीच्यावतीने दररोज स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसात विविध कार्यक्रमातून शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्लास्टिक बंदीबाबत स्टींग ऑपरेशनही करण्यात आले. गुरुवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात तसेच शहरातील सर्व दुकानांमधून मुख्याधिकारी कविता बोरकर यांच्यासमवेत नगरपंचायत कर्मचारी यांनी तपासणी केली. या तपासणीत त्यांच्याकडे असलेल्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. सुरुवातीच्या केलेल्या कारवाईमध्ये कोणावरही कारवाई केली नसली तरी यापुढे कोणी प्लास्टिक वापर केल्यास पहिल्या वेळेस रुपये ५ हजार, दुसऱ्या वेळेस सापडल्यास रूपये १० हजार व तिसऱ्यावेळा पुन्हा पुनरावृत्ती झाल्यास २५ हजारापर्यंत दंड व ३ महिने कारावास याची शिक्षा केली जाणार आहे. प्लास्टिक बंदीसाठी शहरवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन गुहागर नगरपंचायततर्फे करण्यात आले आहे.

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here