”ही तर नुसती सुरुवात, अजून महत्त्वाचा भाग बाहेर येणे बाकी”

0

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर काहीच दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली गाडी आणि त्यानंतर त्या गाडीच्या मूळ मालकाचा म्हणजेच मनसुख हिरेन यांचा धक्कादायक मृत्यू झाला. या प्रकरणा राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. महाविकासआघाडीला कोंडीत पकडण्याची एकही संधी यावेळी भाजपने सोडली नाही. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर NIAने सचिन वाझे यांना अटक केली आणि आता विशेष न्यायालयाने वाझेंना NIAकोठडी सुनावली आहे. दरम्यान, वाझेंच्या अटकेची मागणी भाजपकडून मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे, या पार्श्वभूमीवर ‘आता नुसती सुरूवात झाली आहे, सध्या एकच भाग बाहेर आला आहे, दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे’ असे सूचक विधान रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे

देवेंद्र फडणवीस याविषयी बोलताना म्हणाले कि, ‘हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ज्यावेळी याचे काही पुरावे माझ्याजवळ आले. त्यावेळी मी ते सभागृहात यासाठीच मांडले. की समजा पोलिसमधीलच लोकं अशाप्रकारे जर काम करणार असतील आणि अशाप्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होणार असतील, तर कायदा आणि सुव्यवस्था राहील कशी? म्हणून हा सगळा विषय मी सातत्याने मांडत होतो.’ पुढे बोलताना फडणवीस असेही म्हणाले, ‘माझं मत असं आहे की, अजुन यातला एकच भाग बाहेर आलेला आहे. दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे. मनसुख हिरेन यांची जी हत्या आहे, आता तर ही गाडी त्या ठिकाणी ठेवल्याचा जो गुन्हा आहे. त्या गुन्ह्याच्या संदर्भात आज एनआयएने आज रिमांड मागितला आहे. परंतु, मनसुख हिरेन हत्याप्रकरण देखील महत्वाचं आहे. त्यामध्येही प्रचंड मोठे धागेदोरे आणि पुरावे हे मला असं वाटतं की, तपासयंत्रणांना उपलब्ध होत आहेत. त्यामध्येही लवकरच कारवाई होईल अशी माझी अपेक्षा आहे.’ असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. पुढे महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, ‘दुर्देवाने सरकारच्यावतीने केवळ त्यांना पाठीशी घालण्याचं काम सातत्याने होत होतं. कुठंतरी त्यांची वकिली करण्याचं काम हे सरकारच्यावतीने सातत्याने होत होतं. मला असं वाटतं की आती जी एनआयएची कारवाई झाली आहे. त्यामध्ये अनेक पुरावे एनआयएला मिळालेले आहेत. कशाप्रकारे हा संपूर्ण गुन्हा घडला आहे? हे देखील समोर आलेलं आहे.’ त्याचप्रमाणे, ‘हे प्रकरण केवळ सचिन वाझे यांच्या पुरतं मर्यादित नाही. कोण कोण यामाध्ये आहे? कोणाला याचा पाठिंबा आहे? कुणी कुणी या प्रकरणात काय काय भूमिका निभावली आहे? या सर्व गोष्टी बाहेर येणं आवश्यक आहे’, असेही फडणवीस म्हणाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:24 AM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here