रत्नागिरी : शासनाचे कोरोनाविषयक नियम पाळून पारंपरिक पध्दतीने गर्दी न करता यंदा भैरी देवस्थानचा शिमगोत्सव साजरा करण्याचा निर्णय बारा वाड्यांच्या बैठकीत झाला. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भैरी मंदिर उघडे राहील. त्यानंतर कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. देवळाच्या बाहेर बॅरिकेड्स लावण्यात येणार आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे शासनाने शिमगोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्या अनुशंगाने प्रशासनाकडून ग्रामस्थांना आवाहन केले आहे. रत्नागिरी शहरातील भैरीचा शिमगा प्रसिध्द असून पौर्णिमेला हजारो नागरिक उत्सावाला हजेरी लावतात. कोरोनामुळे ही गर्दी टाळण्यासाठी देवस्थानतर्फे प्रयत्न सुरु होते. यासाठी रविवारी (ता. 14) बारा वाड्यांची बैठक घेण्यात आली. त्यात भैरीचा शिमगा शांततेत आणि कमी गर्दीत साजरा करण्याचा निर्णय झाला. यावेळी जाकीमिर्या व सडा मिर्या येथील पालख्या देवळात भेटणार नाहीत. पण भैरी मंदिरात त्यांच्या सोयीनुसार देवाची भेट घडवून आणली जाईल. पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजता मंदिरातून दरवर्षीप्रमाणे भैरी बुवाची पालखी बाहेर पडेल. ती रथावर विराजमान होणार असून कोणाला खांद्यावर पालखी घेता येणार नाही किंवा नाचवता येणार नाही. ज्या रस्त्यावर गाडी जाणे शक्य नाही, तेथेच पाय वाटेने लोकांच्या खांद्यावरून वाहून नेली जाईल. भैरीच्या पालखीच्या नगर प्रदर्शनाच्या वेळी हुलपे स्वीकारले जातील. पण ते पालखीपासून ठराविक अंतर ठेवूनच घेतले जातील. ते घेताना सॅनिटाईज करुन घेतले जातील. या प्रसंगी कोणालाही पालखी जवळ जाता येणार नाही. होळी ही यंदा उंचीने लहान असून काही ठराविक लोकांच्या उपस्थितीत झाडगाव येथील सहाणेवर उभी करण्यात येणार आहे. लोकांनी गर्दी करू नये शक्य असेल तर ऑनलाईनच दर्शन घेण्याचे आवाहन देवस्थान ने केले आहे. सहाणेवर पालखी बसल्यानंतर ठराविक अंतर ठेवून लोकांचे उलपे स्विकारले जाणार आहेत. यंदाचा शिमगा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असल्यामुळे सगळ्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. पण सुरक्षित आचरण करून सगळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. सगळ्या रूढी-परंपरा पाळून भैरी जोगेश्वरी चा शिमगा उत्सव यंदा होणार असला तरी लोकांच्या उपस्थितीवर मर्यादा राहणार आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:57 PM 15-Mar-21
