टिळकांची शाळा गेली कुठे ?

0

रत्नागिरी : “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असे इंग्रज सरकारला ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शाळेची आज वाताहत लागलेली दिसत आहे. शहरातील नवीन भाजी मार्केट येथिल शाळेत लोकमान्य टिळकांचे बालपणीचे काही शिक्षण झाले. १५ जुलै १८६६ रोजी टिळकांनी या शाळेत प्रवेश घेतला व काही महिने या शाळेत शिक्षण देखील घेतले. कालांतराने तत्कालीन नगराध्यक्ष ज. श. केळकर यांनी येथे नगरपालिकेच्या शाळेची इमारत उभारली. या इमारतीचे भूमिपूजन १ ऑगस्ट १९७६ रोजी जेष्ठ साहित्यिक कै. दुर्गा भागवत यांच्या हस्ते करण्यात आले होते. लोकमान्य टिळक विद्यालय नगर परिषद शाळा क्रमांक दोन या नावाने हि शाळा नावारूपाला आली. मात्र १९७६ साली बांधलेली हि इमारत आता मोडकळीस येऊन धोकेदायक ठरल्याने पाडण्यात आली आहे. यावेळी येथे सुरु असणारे वर्ग नगरपालिकेच्या गाडीतळ येथील शाळेत हलवण्यात आले आहेत. यावेळी या शाळेवर १२ शिक्षक व ३२० विद्यर्थ्यांचा पट होता. रत्नगिरीकरांना अपेक्षित होते कि काही वर्षातच येथे शाळा उभी राहून लोकमान्यांच्या स्मृती येथे जपल्या जातील. मात्र नगरपालिका सत्ताधाऱ्यांची याबाबत अनास्था दिसून येत आहे. नगरपालिका शाळा या आजदेखील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा भाग ठरत आहेत. दामले विद्यालयासारख्या शाळेतील विद्यार्थी अनेक परीक्षांमधून उज्वल यश संपादन करीत आहेत. अशा वेळी या शाळांना नगरपालिकेकडून पाठबळ मिळणे गरजेचे आहे. मात्र सत्ताधाऱयांचे याकडे लक्ष दिसत नाही. यामुळेच आता टिळकांची शाळा गेली कुठे ? असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
04:56 PM 15/Mar/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here