कागदपत्रांमध्ये हेराफेरी करत खोटे खरेदीखत करणाऱ्या दुय्यम निबंधकासह दांपत्यावर गुन्हा दाखल

0

खेड : दुय्यम निबंधकाला हाताशी धरून कागदपत्रांमध्ये हेराफेरी करत खोटे खरेदीखत करणाऱ्या दांपत्यासह दुय्यम निबंधकाविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 मे 2019 ते 11 मार्च 2021 या कालावधीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील संशयित आरोपी रुपेश रमेश पाटणे व त्याची पत्नी धनश्री रुपेश पाटणे यांनी खेड येथील दुय्यम निबंधक यांना हाताशी धरून शांती हाईट्स, कुंभारआळी, खेड येथील फ्लॅट क्रमांक 102, 301 व 303 या मिळकती तक्रारदार संजय पांडुरंग पाटणे (वय 54, रा. बोरिवली, सध्या रा. खेड) यांच्या मालकीच्या असताना या मिळकती बळकावण्यासाठी धनश्री रुपेश पाटणे यांच्या नावाने खरेदीखत करण्याचे अधिकार नसलेल्या कुलमुखत्यारपत्राने तक्रारदार यांच्या संमतीशिवाय परस्पर बेकायदा खरेदी करून विश्वासघात करण्यात आला. तसेच फसवणूकीसारखा गंभीर गुन्हा त्यांनी केला होता, असा आरोप ठेवण्यात आला आहे. संजय पांडुरंग पाटणे यांच्या मालकीच्या फ्लॅट क्र. 103 मध्ये बेकायदा कब्जा करून त्यामध्ये विनापरवाना फेरबदल करून इमारतीला धोका निर्माण होईल असे वर्तन केले व संजय पाटणे यांचे मोठे नुकसान केले, असाही आरोप आहे. या गुन्ह्याच्या कृत्यात दुय्यम निबंधकदेखील सामील असल्याची माहिती मिळताच त्यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली. खेड पोलिसांनी रुपेश रमेश पाटणे, धनश्री रुपेश पाटणे व दुय्यम निबंधक यांच्याविरोधात भा.दं.वि. क.420, 406, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:08 PM 15-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here