तालुक्यातील पावस बाजारपेठे येथील घरात स्टोव्हचा भडका उडाल्याने घराला आग लागली. शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत दिड लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
याबाबत असिफ लतिफ कासू (४५, पावस बाजारपेठ) यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. असिफ कासू यांच्या घराचा वरचा मजला हराराम रायका यांना भाडयाने दिलेला आहे. दोन वर्षांपासून ते या ठिकाणी भाडयाने वास्तव्यास आहेत. हराराम रायका शुक्रवारी दुपारी घरामध्ये जेवण बनवत असताना स्टोव्हचा भडका उडाला. या आगीत स्टोव्हनजिक असलेल्या तेलाने पेट घेतला आणि क्षणार्धात घरात आगीचा भडका उडाला.
आगीचा भडका उडताच घराची कौले उडाली. यामुळे सिमेंटचे पत्रे, लाकडी वासे जळून खाक झाले. तसेच घराचा वरचा मजला पूर्णत: जळून गेला. यामुळे घराचे एकणु दिड लाख रूपयांचे नुकसान झाले. आग विझवण्यासाठी फिनोलेक्ससह रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले होते.
